गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री तनूश्री दत्ता ही चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. पण हॅशटॅग मीटू मोहिमेमुळे ती चर्चेत होती. तिने २००७मध्ये 'हॉर्न ओके प्लिज' चित्रपटाच्या सेवटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर तनुश्रीने कोर्टात धाव घेतली. आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आङे. या पोस्टमध्ये तिने 'मला काही झाले तर नाना पाटेकर जबाबदार असतील' असे म्हटले आहे. त्यामुळे तनुश्री आणि नाना पाटेकर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
तनुश्रीने काळ्या रंगाच्या वनपिसमधील फोटो शेअर करत, “जर पुढे माझे काही झाले तर त्यास नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि टीम तसेच त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण आहेत? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणी ज्या व्यक्तींची नावे समोर आली तेच लोक बॉलिवूड माफिया आहेत. (या सगळ्यांचे वकील सारखेच होते.)” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
पुढे ती म्हणाली, 'त्यांचे चित्रपट पाहू नका, त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका. काही पत्रकार आणि इंडस्ट्रीमधील लोकांनी माझ्याविषयी चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत. त्यांचे आयुष्य नरकासारखे बनवा कारण त्यांनी मला प्रचंड त्रास दिला आहे. कायदा आणि न्याय मिळवण्यात मी अपयशी ठरले आहे. पण मला या देशातील लोकांवर विश्वास आहे.'
सध्या सोशल मीडियावर तनुश्रीची ही पोस्ट चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत तुला नेमके काय हवे आहे? या अशयाच्या कमेंट केल्या आहेत.