Tanaji Galgunde Girlfriend : नव्या वर्षाची सुरुवात अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देऊन केली. काहींनी आपल्या प्रेमाचा चेहरा लोकांना दाखवला, तर काहींनी मात्र सीक्रेट ठेवला. आता नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या चित्रपटात 'लंगड्या'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता तानाजी गळगुंडे याने देखील नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीचा चेहरा लोकांना दाखवला आहे. तानाजीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या सोशल मीडिया स्टोरीच्या माध्यमातून आयुष्यातील एका खास व्यक्तीचा चेहरा सगळ्यांना दाखवला. इतकंच नाही तर, आपल्या प्रेमाला किती विरोध झाला हे देखील त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
'सैराट' या चित्रपटाने अभिनेता तानाजी गळगुंडे याला मोठं यश मिळवून दिलं होतं. या चित्रपटानंतर त्याच्या हातात अनेक नव्या संधी चालून आल्या होत्या. या दरम्यान त्याने आपल्या शेतीच्या व्यवसायात देखील अनेक सुधारणा केल्या. त्याने शेतीतही खूप मेहनत केली. तर, दुसरीकडे तो अभिनय क्षेत्रात काम करत राहिला. या सगळ्या दरम्यान त्याने आपल्या पायाच्या स्थितीत सुधारणा घडावी म्हणून काही शस्त्रक्रिया करण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्याच्या पायावर एक-दोन नव्हे, तर तब्बल १० शस्त्रक्रिया झाल्या. या सगळ्यात त्याच्या या गर्लफ्रेंडने त्याची खूप काळजी घेतली. मात्र, याच वेळी तानाजीच्या आईला त्याच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली.
एका युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तानाजी आपल्या प्रेमाला झालेल्या विरोधाबद्दल सांगताना म्हणाला की, 'माझी गर्लफ्रेंड ही दुसऱ्या जातीची आहे. आम्ही गेली ५-६ वर्ष एकमेकांना डेट करत होतो. माझ्या ऑपरेशनच्या काळात तिने मला खूप साथ दिली. या सगळ्यात तिने माझी खूप काळजी घेतली. या काळात ती माझ्यासोबतच राहत होती. मात्र, माझ्या आईला आम्ही लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे कळले आणि ती खूप चिडली. आईला ही नातं मान्य नव्हतं, कारण आमच्या जाती वेगळ्या होत्या. आई सतत म्हणायची की, कुणाशीही लग्न कर पण ही मुलगी नको. या मुलीची आई आपल्याच गावात राहते. त्यामुळे लोकांना कळेल आणि उगाचचे वाद होतील, यांची आईला भीती वाटत होती.'
मात्र, या सगळ्या विरोधाला मोडून काढत तानाजी आपल्या प्रेमासोबत खंबीरपणे उभा राहिला. अखेर आता नवीन वर्षाचं निमित्त साधून त्याने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत, सगळ्यांना या खास व्यक्तीचा चेहरा देखील दाखवला. तानाजीच्या गर्लफ्रेंडचे नाव प्रतीक्षा शेट्टी असून, तिचा स्वतः हँडमेड साबणाचा व्यवसाय आहे.
संबंधित बातम्या