Man Who Touched Esha Deol Inappropriately: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशाने 'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती 'धूम', 'ना तुम जानो ना हम', 'कुछ तो है' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. नुकतीच ईशा भरत तख्तानीसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, आता ईशाने तिच्या एका मुलाखतीत स्वत:सोबत घडलेला एक प्रसंग सांगितला, ज्यामुळे तिला चांगलाच धक्का बसला. एका चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी एका व्यक्तीने ईशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अभिनेत्रीने त्याला असा धडा शिकवला, जो तो कधीच विसरू शकणार नाही.
ईशा देओलने 'द मेल फेमिनिस्ट'च्या एका एपिसोडमध्ये बोलताना झालेल्या छेडछाडीच्या घटनेची आठवण सांगितली. २००५ मध्ये पुण्यात दसच्या प्रीमिअर इव्हेंटमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, जायद खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासह तिचे अनेक सहकलाकार उपस्थित होते. बाऊन्सर्सनी घेरूनही गर्दीतील एका व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि ती कार्यक्रमात प्रवेश करत असताना हा प्रकार घडला होता. तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने ईशा देओल हिला अतिशय चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.
यानंतर ईशा म्हणाली की, ‘जेव्हा मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आत शिरत होते, त्यावेळी मला अनेक बाऊन्सर्सनी घेरले होते. तरीही एका व्यक्तीने तेव्हा गर्दीचा फायदा घेत मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यानंतर मी आजूबाजूला पाहिलं आणि मग थेट त्या व्यक्तीला पकडून गर्दीतून बाहेर काढलं आणि सर्वांसमोर जोरदार थप्पड मारली.’
त्यानंतर ईशा देओल म्हणाली की, ती या घटनेकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. ईशा देओल म्हणाली की, 'मी फार रागीट व्यक्ती नाही, पण जर कोणी माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे काही केले, तर मी त्यावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकत नाही. अशा चुकीच्या परिस्थितीत महिलांनी आवाज उठवलाच पाहिजे. पुरुष शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत आहेत, याचा अर्थ असा नाही की ते आपला फायदा घेऊ शकतात. मला वाटते की स्त्रिया भावनिकदृष्ट्या मजबूत असतात आणि आपण अशा प्रकारचे शोषण सहन करू नये. '