नव्वदच्या दशकामध्ये करिअरला सुरुवात करणारी बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही आजही प्रचंड सक्रिय दिसते. तिचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहाताना दिसत आहे. तब्बूची गणना आज इंडस्ट्रीमधील अतिशय प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये केली जाते. तब्बूची प्रत्येक सिनेमामधील भूमिका कायम चर्चेत राहिली आहे. पण सध्या तब्बू एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तब्बूने एका मुलाखतीमध्ये केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. आता खरच तब्बूने हे वक्तव्य केले आहे की फेक आहे चला जाणून घेऊया...
तब्बू तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. तब्बू ही ५३ वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिला तिच्या लग्नाविषयी आणि पार्टनरविषयी प्रश्न विचारले जातात. अशाच एका मुलाखतीत तब्बूने या प्रश्नावर दिलेले उत्तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. “लग्न नको, मला फक्त माझ्या बेडवर एक पुरुष हवा”, असे वक्तव्य तब्बूने केल्याचे त्या मुलाखतीत म्हटले गेले. आता याच वृत्तावर तब्बूने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तब्बूच्या टीमकडून याबद्दल निवेदन जाहीर करण्यात आले आहे. हे सर्व खोटं असल्याचे तिने म्हटले आहे.
सोशल मीडियावर ही मुलाखत व्हायरल होताच तब्बूने निवेदन जारी केले आहे. या निवेदनात तिने म्हटले की, ‘हे छापणं थांबवा. तब्बूच्या नावाने काही अपमानास्पद आणि खोटी वक्तव्ये सांगणाऱ्या अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडल्स आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की तिने कधीही असं वक्तव्य केलं नाही. प्रेक्षकांची दिशाभूल करणं हे नैतिकतेचं गंभीर उल्लंघन आहे. आम्ही मागणी करतो की या वेबसाइट्सने ही खोटी वक्तव्ये त्वरित काढून टाकावीत आणि त्यांच्या कृत्यांसाठी औपचारिक माफी मागावी.’
वाचा: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
तब्बूच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अक्षय कुमारसोबत ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय आणि तब्बूसोबत परेश रावल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले आहे. जवळपास २५ वर्षांनंतर अक्षय आणि तब्बू एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या