Zakir Hussain Dies at 73: प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे आज (१५ डिसेंबर २०२४) निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन हे हृदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्यांमुळे झाकीर हुसेन यांना दोन आठवड्यांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. अखेर आज त्यांचे निधन झाले. झाकीर हुसेन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांचे अनेक कॉन्सर्ट रद्द करण्यात आले होते.
झाकीर हुसेन यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी पहिल्यांदा तबला वादन केले. हळूहळू त्यांनी सराव सुरू केला आणि मग वयाच्या सातव्या वर्षी ते तबला वादनात पारंगत झाले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली आणि आजही ते आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करायचे. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय तबलावादक आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. झाकीर हुसेन हे तबलावादक तसेच उत्तम अभिनेते आहेत. त्यांनी १२ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय झाकीर हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. १९९० मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
झाकीर हुसेन यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या वडिलांकडून घेतले. त्यांनी लहानपणीच आपल्या मुलाला वेगवेगळ्या संगीत गटांमधील फरक समजावून सांगितला होता आणि आपल्या इच्छांसह संतुलन राखण्यास शिकवले. नंतर त्यांच्यावर उस्ताद हबीबुद्दीन खान, खलिफा वाजिद हुसेन, कांथा महाराज, शांता प्रसाद यांसारख्या दिग्गजांचा प्रभाव पडला. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत झाकीर हुसैन यांनी सांगितले होते की, त्यांचा संघर्ष सुमारे २०-२५ वर्षे चालला.