TMKOC Bhavya Gandhi: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक आहे. गेली १६ वर्षे ही मालिका सुरू असून, आजही प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते. इतकंच नाही, तर मालिकेतले अनेक बालकलाकारही आता मोठे झाले. या मालिकेतील लोकप्रिय पात्रांपैकी एक ‘टप्पू’ हे पात्र आहे. टप्पूची व्यक्तिरेखा सगळ्यात आधी अभिनेता भव्य गांधी याने साकारली होती. प्रेक्षकांच्या या लाडक्या शोमध्ये काम करतच तो लहानाचा मोठा झाला. या मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. मात्र, नंतर भव्यने हा शो सोडला. आता भव्याने शो सोडण्यापूर्वी त्याच्या मनात काय आलं ते सांगितलं आहे.
टेली टॉकशी बोलताना ‘टप्पू’ फेम भव्य म्हणाला की,'मला सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ते कराचं असेल, तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तुला ते करायचं नसेल तरी देखील आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्यावेळी मी काय विचार करत होतो हे मला आठवत नाही, पण मला एवढेच आठवते की मी एका प्रश्नामुळे खूप घाबरलो होतो.
भव्य पुढे म्हणाला की, ‘आमच्या शोचा एक कायदेशीर फॉरमॅट आहे, तो मी पूर्ण केला. या नुसार ३ महिन्यांचा नोटीस पीरियड होता, पण मी ९ महिन्यांचा नोटीस पिरीयड पूर्ण केला आणि त्यानंतर हा शो सोडण्या ऐवजी काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेण्याचा विचार केला होता.’
भव्यने शो सोडावा अशी निर्मात्यांची अजिबात इच्छा नव्हती. भव्याने ९ महिन्यांची नोटीस पिरीयड का सर्व्ह केला, याबद्दल देखील त्याने सांगितले. त्याने सांगितले की, निर्मात्यांनी त्याला शो न सोडण्याविषयी सांगितले होते. इतर लोकही तेच सांगत होते. मात्र, त्याने ठरवलं की, तो आता या शोला रामराम करेल आणि स्वत:चं काहीतरी सुरू करेल. मात्र, हे सगळं ठरवत असताना मनातून मी खूप घाबरलो होतो, असे भव्य गांधी म्हणाला.
भव्य गांधीव्यतिरिक्त आतापर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘अंजली’ची भूमिका साकारणारी नेहा मेहता, ‘मिसेस सोढी’ची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री, ‘सोढी’ची भूमिका साकारणारी गुरचरण सिंह, ‘सोनू’ची भूमिका साकारणारी झील मेहता आणि निधी भानुशाली, ‘गोली’ची भूमिका साकारणारा कुश शाह या कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. यापैकी काही पात्रांसाठी नवे चेहरे मिळाले आहेत. पण, आजपर्यंत ‘दया बेन’ या पात्रासाठी निर्मात्यांना नवा चेहरा सापडलेला नाही. यापूर्वी अभिनेत्री दिशा वकानी ही व्यक्तिरेखा साकारत होती.