मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता...’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?

सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता...’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 29, 2024 01:18 PM IST

Gurucharan Singh missing : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील लोकप्रिय पात्र ‘रोशन सिंह सोढी’ साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता होऊन आता ६ दिवस उलटून गेले आहेत.

सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता...’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?
सहा दिवस उलटूनही ‘तारक मेहता...’मधील ‘सोढी’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह सापडेना! शेवटी कुठे गेला होता?

Actor Gurucharan Singh missing: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील लोकप्रिय पात्र ‘रोशन सिंह सोढी’ साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गुरुचरण सिंह बेपत्ता होऊन आता ६ दिवस उलटून गेले आहेत. २६ एप्रिल रोजी त्याच्या बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेता गुरुचरण सिंह याने ‘तारक मेहता...’ मालिका सोडली असली, तरी आजही लोक त्याला ‘सोढी’ म्हणूनच ओळखतात. अभिनेता अचानक गायब झाल्याचे समजताच सगळेच हैराण झाले आहेत. त्याचे वडील हरगीत सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. दरम्यान, त्याचे शेवटचे ठिकाण आणि एटीएममधून काही पैसे काढल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता गुरचरण सिंह बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याला २२ एप्रिलला दिल्ली विमानतळावर जायचे होते, असे म्हटले जात आहे. त्याच दिवशी त्याला दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी विमान पकडायचे होते, पण तो विमानतळाच्या दिशेने गेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, अभिनेता दिल्लीतील पालमसह इतर अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी अभिनेता गुरुचरण याने त्याच्या दिल्लीतील घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एटीएममधून ७ हजार रुपये काढले होते. त्यानंतरच त्याचा फोन बंद येऊ लागला. म्हणजेच २४ एप्रिलपर्यंत अभिनेता दिल्लीतच होता आणि त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. याचाच अर्थ २४ तारखेला गुरुचरण हा त्याच्या पालम येथील घरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जागी उपस्थित होता.

प्रेम विवाह म्हणजे प्रेम नाही! नात्यांचा उलगडा करणारा मराठी चित्रपट ‘प्रेमम’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कुठे जात होता अभिनेता?

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंह लग्नाच्या तयारीत होता. तर, या दरम्यान तो आर्थिक संकटातूनही जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फ्लाइटची वेळ रात्री ८.३०ची होती. पण, फोनवरील शेवटचे लोकेशन रात्री ९.१४च्या सुमारास पालम येथे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण सिंह याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. तिला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ती आता घरी परत आली आहे. मात्र, सध्या संपूर्ण कुटुंब गुरुचरणच्या काळजीत आहे आणि अभिनेता लवकरच घरी परतेल, अशी आशा सगळ्यांना आहे.

‘तारक मेहता...’मुळे मिळाली प्रसिद्धी!

अभिनेता गुरुचरण सिंह हा २००८ ते २०१३ या काळात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये ‘रोशन सिंह सोढी’ ही भूमिका करत होता. मात्र, निर्माते असित मोदी यांच्यासोबत झालेल्या वादांमुळे त्यांने शो सोडला. मात्र, त्याच्या लोकप्रियतेमुळे आणि प्रेक्षकांच्या मागणीमुळे निर्मात्यांनी त्याला शोमध्ये परत बोलावले. परंतु, २०२०मध्ये त्याने पुन्हा शो सोडला. आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी गुरुचरणने दुसऱ्यांदा हा शो सोडला होता. त्याच्या वडिलांची एक शस्त्रक्रिया झाली होती. आणि त्यामुळे अभिनेता करिअर सोडून घरात बसला.

IPL_Entry_Point