Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Shailesh Lodha: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील काही स्टारकास्ट बदलली देखील गेली आहे. अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. मात्र, जेव्हा दिशा वाकानी आणि शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. शैलेश लोढा या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारत होते. तर, दिशा वाकानी जेठालालच्या पत्नीची म्हणजे दयाभाभी भूमिका साकारत होती. शैलेशने अचानक शोमधून एक्झिट घेतल्याने प्रेक्षक गोंधळून गेले होते. मात्र, अभिनेत्याने यावर चुप्पी साधली होती. अखेर आता त्यांनी शो सोडण्याच्या दिवशी काय घडलं याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
शैलेश लोढा म्हणाले की, ‘मी हा शो सोडण्याचे कारण कधीही माझे मानधन किंवा पैसे नव्हते. माझा आत्मसन्मान दुखावला गेल्यामुळे मी हलक्याफुलक्या कथा दाखवणारी ही मालिका सोडली.’ शैलेश लोढा यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निर्माते असित मोदी त्यांच्याशी अतिशय उद्धटपणे बोलले, ज्यानंतर त्यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर असित मोदी यांनी आपले शब्द फिरवले. मात्र, शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्याचा निर्णय ठाम ठेवला.
शैलेश लोढा यांनी त्या दिवशी काय घडलं हे सांगताना म्हटलं की, त्यांना एका कार्यक्रमात खास पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले होते आणि ते कवी म्हणूनही त्यात गेले होते. त्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी यांचा फोन आला. त्यांनी या कार्यक्रमासंबंधी विचारणा केली. त्यावर शैलेश यांनी उत्तर देताना सांगितले की, ते या मालिकेचे पात्र म्हणून नव्हे, तर कवी म्हणून या शोमध्ये गेले होते. मात्र, असित मोदी त्यांच्याशी अत्यंत उद्धट स्वरात बोलले जे त्यांना सहन झाले नाही.
शैलेश लोढा म्हणाले की, असित मोदी यांनी मला खूप शिवीगाळ केली. यावेळी मी सहन करू शकलो नाही. कारण ही काही त्यांची पहिली वेळ नव्हती. या आधी देखील असाच एक प्रसंग आला होता, तेव्हा असित म्हणाले की, इथे सेटवर काम करणारे सगळे माझे नोकर आहेत.' मात्र, असती मोदी यांनी शैलेश यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तर, आता शैलेश लोढा यांनी आपले पैसे न मिळाल्याने असित कुमार मोदी विरोधात तक्रार दाखल केली आहे.