Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Update: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने टीव्ही विश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर, काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका बंद करा, ही मागणी ट्रेंड होत होती. प्रेक्षक गेली ६ वर्षे 'दयाबेन' या पात्राची मालिकेत परतून येण्याची वाट बघत आहेत. नुकत्याच एका प्रोमोमध्ये ती परत येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष एपिसोडमध्ये ती आलीच नाही. यामुळे प्रेक्षक नाराज झाले. यानंतर मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी सुरू झाली. आता खरंच ही मालिका बंद होणार का? यावर निर्माते असित कुमार मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांची लाडकी आहेत. मात्र, त्यातही दयाभाभी आणि जेठालाल यांच्या कुटुंबावर प्रेक्षकांचं विशेष प्रेम आहे. या मालिकेत 'दयाबेन' साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकाणी हिने ६ वर्षांपूर्वी मॅटर्निटी ब्रेक घेतला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ती मालिकेत परतून आलीच नाही. दिशा वाकाणी 'दयाबेन' बनून मालिकेत परतून येईल, अशी आशा मनी बाळगून प्रेक्षक या शोला भरभरून प्रेम देत होते.
सध्या मालिकेच्या ट्रॅकमध्ये दयाभाभी सोसायटीमध्ये परतली, असे दाखवण्यात आले होते. मात्र, ती मालिकेत परतलीच नाही. मोठी हाईप निर्माण करून, प्रेक्षकांची उत्सुकता ताणून मेकर्सनी पुन्हा एकदा सगळ्यांची निराशा केल्याने सगळेच संतापले आहेत. यामुळेच सोशल मीडियावर 'बॉयकॉट तारक मेहता का उल्टा चष्मा' ट्रेंड होत आहे. ही मालिका आता बंद करून टाका, अशी मागणी होत असताना मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. ते म्हणाले की, ‘मी प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे म्हणून काम करत आहे. मी माझ्या प्रेक्षकांशी कधीही खोटं बोलणार नाही.’
असित मोदी पुढे म्हणाले की. 'सध्या परिस्थितीची अशी निर्माण झाली आहे की, आम्ही दयाबेनचे पात्र मालिकेत परत आणू शकत नाही आहोत. मात्र, याचा अर्थ नाही की, दयाबेन कधीच परत येणार नाही. या पात्रासाठी आता दिशा वाकाणीच येईल की, आणखी कुणी.. हे येणारी वेळच सांगेल. पण, 'तारक मेहता का उल्टा चष्मा बंद होणार नाही, आणि दयाबेन मालिकेत परतून येईलच, हे माझं प्रेक्षकांना वचन आहे. कोणतीही लीप न घेता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली १५ वर्ष प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे.