'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो लोकांच्या पसंतीस उतरला आहे. खळखळून हसवणाऱ्या या शोचे चाहते जगभरात आहेत. हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. नुकताच हा शो बबिताजी आणि टप्पूच्या एंगेजमेंटमुळे चर्चेत होता. आता हा शो चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल. जेनिफर या शोमध्ये ‘रोशन सोढी’ची भूमिका साकारत होती. जेनिफर मिस्त्रीने गेल्या वर्षी 'तारक मेहता'चे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या संदर्भात त्यांनी असितविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता वर्षभरानंतर यावर निकाल आला आहे. रिपोर्ट्सनुसार, जेनिफरने असितविरोधातील ही केस जिंकली आहे.
या प्रकरणातील निर्णय जेनिफरच्या बाजूने लागला आहे. जेनिफरने असित मोदीवर जे काही आरोप केले आहेत, त्यावर न्यायालयाने तिचे समर्थन केले आहे. यासोबतच न्यायालयाने असित मोदीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. वृत्तानुसार, असितने जेनिफरला १०% व्याजासह संपूर्ण पैसे द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या रकमेव्यतिरिक्त असित कुमार मोदी, जेनिफरला आणखी ५ लाख रुपये दंड म्हणून देणार आहे. मात्र, कोर्टाच्या निर्णयावर अभिनेत्री खूश नाही. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान जेनिफरने केस जिंकल्याबद्दल सांगितले होते. यावेळी ती म्हणाली की, 'होय, मी केस जिंकली आहे. या खटल्याचा निर्णय होऊन ४० दिवस उलटले आहेत. पण आत्तापर्यंत प्रॉडक्शन हाऊसने मला पैसे दिलेले नाहीत. हा माझ्या कष्टाने कमावलेला पैसा आहे. न्यायासाठी मी न्यायालयात धाव घेतली, पण वर्ष उलटूनही मला माझे पैसे मिळालेले नाहीत. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.’
यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘हा ज्या समितीचा आदेश आहे, त्यांनी मला आदेशाचा तपशील प्रसारमाध्यमांसोबत शेअर करू नका असे सांगितले होते, त्यामुळे मी महिनाभराहून अधिक काळ काहीही शेअर केले नाही, पण आत ही गोष्ट माध्यमांसमोर आली आहे, म्हणून मी आता तुम्हाला याबद्दल सांगत आहे.’
जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिने या प्रकरणाबद्दल सांगताना म्हटले होते की, होळीच्या दिवशी शोचे प्रोड्युसर असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांनी तिला जाणूनबुजून बराच वेळ सेटवर ठेवले होते. यानंतर सगळे कलाकार घरी गेल्यानंतर तिघांनी मिळून जेनिफरसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. यानंतर अभिनेत्रीने मुंबईतील पवई पोलीस स्टेशनमध्ये मोदींवर लैंगिक शोषणाचा आरोप करत तिची तक्रार नोंदवली होती. तिने सेटवर मानसिक छळ, लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. मात्र, असित मोदीने अभिनेत्रीचे आरोप फेटाळून लावले होते.
संबंधित बातम्या