Viral Video : जेठालाल आणि तारक मेहता पुन्हा एकत्र; दिलीप जोशी-शैलेश लोढा यांना एकत्र पाहून वेगळ्याच चर्चांना उधाण!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : जेठालाल आणि तारक मेहता पुन्हा एकत्र; दिलीप जोशी-शैलेश लोढा यांना एकत्र पाहून वेगळ्याच चर्चांना उधाण!

Viral Video : जेठालाल आणि तारक मेहता पुन्हा एकत्र; दिलीप जोशी-शैलेश लोढा यांना एकत्र पाहून वेगळ्याच चर्चांना उधाण!

Dec 09, 2024 02:08 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता..’ मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांची भेट एका कार्यक्रमात झाली. यावेळी दोन्ही कलाकार एकमेकांना पाहून खूप खूश झाले होते.

तारक मेहता का उल्टा चश्मा
तारक मेहता का उल्टा चश्मा

Dilip Joshi-Shailesh Lodha Reunion : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची कथा, तसेच स्टारकास्टमुळे त्याची खूप चर्चा होते. हा शो केवळ लहान मुलेच नव्हे तर सर्व वयोगटातील लोक पाहतात. पण गेल्या काही वर्षांपासून हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘तारक मेहता..’च्या अनेक कलाकारांनी केवळ शोच सोडला नाही, तर निर्मात्यांवर गंभीर आरोपही केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मालिकेचे मुख्य नायक जेठालाल गडा म्हणजेच दिलीप जोशी देखील असित मोदीसोबतच्या मतभेदामुळे चर्चेत आले होते. दरम्यान, आता दिलीप आणि शैलेश लोढा यांची एका कार्यक्रमात भेट झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत वर्षानुवर्षे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांची नुकतीच एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी दोन्ही कलाकार एकमेकांना पाहून खूप खूश झाले होते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शैलेश लोढा स्टेजवर पोज देत असताना दिलीप जोशी तिथे आले. त्यांना पाहताच शैलेशने त्यांना बोलावून त्यांच्यासोबत पोझ दिली. यावेळी त्यांच्यासोबत शोची अंजली भाभी म्हणजेच सुनयना फौजदारही दिसली.

चर्चांना आले उधाण! 

शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मालिकेतून काढता पाय घेतल्याने चाहत्यांना देखील धक्का बसला होता. त्यांनी हा शो सोडल्यानंतर निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले होते. दोघांचा वाद खूपच गाजला होता. दरम्यान आता शैलेश आणि दिलीप एकत्र दिसल्याने दोघे पुन्हा एकत्र काम करतील का? असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे, दिलीप जोशी देखील शो सोडतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

चाहते झाले खूश!

शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांना पुन्हा एकत्र पाहून आनंद झाला. हा व्हिडिओ समोर येताच चाहते आपला आनंद व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. एका युजरने कमेंट केली की, ‘काय दिवस होते ते...’ एकाने लिहिले की, ‘मला ही मैत्री खूप आवडली’. आणखी एकाने लिहिले की, ‘माझी इच्छा आहे की, आम्ही त्यांना पुन्हा एकत्र पाहू शकू.’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत.

Whats_app_banner