'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम ‘रोषण सिंह सोढी’ अर्थात अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या २२ एप्रिलपासून बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे बेपत्ता मुलाला शोधण्यासाठी एफआयआर देखील दाखल केला होता, मात्र, आता तब्बल २५ दिवसांनी गुरुचरण आपल्या घरी परतला आहे. या बातमीने गुरुचरण सिंह यांचे चाहते खूप खूश दिसत आहेत. घरी परतल्यानंतर गुरुचरण सिंह यांनी आपण धार्मिक प्रवासासाठी निघून गेल्याचा खुलासा केला आहे. गुरुचरण सांसारिक गोष्टींनी कंटाळला होता. म्हणूनच कोणाला काहीही न सांगता तो घरातून निघून गेला होता. या २५ दिवसांत रो अमृतसर आणि नंतर लुधियाना येथे काही काळ राहिला. गुरुचरण अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्येही राहिला, पण आता घरी परतले पाहिजे, असे मनाला वाटताच तो घरी परत आला.
नुकताच घरी परतल्यानंतर गुरुचरण सिंह यांची पहिली झलक समोर आली आहे, जी पाहून त्यांचे चाहते दु:खी दिसत आहेत. या फोटोत गुरुचरण सिंह काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेल्या आणि पट्टेदार पगडी घातलेला असून, पोलिसासोबत उभे राहून पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये त्याची दाढी बरीच वाढलेली आणि पंढरी झालेली देखील दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसतो आहे. गुरुचरण सिंहचा हा लूक पाहून त्यांचे चाहते कमेंट करताना आणि त्यांच्या या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.
अभिनेता गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी मुंबईहून दिल्ली जाण्यासाठी निघाला होता. मात्र, २६ एप्रिलला तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे आढळून आले. या अभिनेत्याला दिल्ली विमानतळावर पाहिले गेले होते. पण, त्यानंतर तो कुठे गायब झाला हे कुणालाच कळले नाही. यानंतर त्याच्या वडिलांनी पालम पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यानंतर अनेक नवे क्लूस मिळाले. मात्र यानंतरही अभिनेत्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. पण, आता अखेर तो घरी परतला आहे, त्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब आणि चाहते खूप आनंदी दिसत आहेत.
या दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले होते की, अभिनेता लवकरच लग्न करणार होता. तर, गुरुचरण हा आर्थिक संकटात देखील होता. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने एटीएममधून पैसेही काढल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यासोबतच अभिनेता दोन फोन वापरत होता आणि २५हून अधिक ईमेल अकाऊंट्सही वापरत असल्याचे पोलीस तपासात आढळून आले होते. अभिनेत्याची तब्येतही गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती.