Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Controversy: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदींच्या मागे लागलेला वादांचा ससेमिरा थांबण्याचे नावच घेत नाहीये. एकापाठोपाठ एक कलाकार आता असित मोदी विरोधात तक्रार करत आहेत. शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, मोनिका भदोरियानंतर आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘रिटा रिपोर्टर’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा-राजदा हिनेही असित मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
प्रिया हिने या मालिकेत साकारलेली ‘रिटा रिपोर्टर’ची भूमिका चांगलीच गाजली होती. सुरुवातीपासूनच ती या शोशी संबंधित होती. मात्र, या शोमध्ये मिळालेल्या वागणुकीमुळे आपण नाखूश असल्याचे प्रियाने म्हटले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर कामाची परिस्थिती कशी होती आणि प्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून शोमध्ये का दिसली नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देखील तिने दिली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्याला कशी अन्यायकारक वागणूक दिली गेली आणि कशाप्रकारे या शोमधून बाहेर काढले गेले, यावर देखील भाष्य केले आहे. प्रिया म्हणाली, ‘होय, तारक मेहतामध्ये काम करताना कलाकारांना मानसिक छळाला सामोरे जावे लागते. पण आता हे अति झाले आहे.’
याबद्दल सांगताना प्रिया आहुजा पुढे म्हणाली की, ‘तिथे काम करताना मला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागले आहे. पण, मला त्याचा फारसा फरक पडला नाही. कारण, माझे पती मालव राजदा यांनी १४ वर्षे त्या शोचे दिग्दर्शन सांभाळले. या दरम्यान असित कुमार मोदी यांनी माझ्याशी कधीच गैरवर्तन केले नाही. पण, कामाचा प्रश्न असेल, तर त्यांची वागणूक अनेक वेळा अन्यायकारक असायची. मालवशी लग्न केल्यानंतर त्यांनी माझा मालिकेतील ट्रॅक कमी केला. यावर मी असित भाई यांना अनेक वेळा मेसेज केले. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.’
प्रिया म्हणाली, ‘या उलट असित मोदी अनेकदा आपल्याला म्हणायचे की, तुला काम करण्याची गरज काय आहे?नवरा कमावतोय, तू राणीसारखी जगतेस.’ दरम्यान, मालवकडे काम असल्याने आणि ती बाकीचे शो देखील करत असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. पण मालवने शो सोडल्यापासून, असित मोदीने तिला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आणि निर्मात्यांनीही तिच्याशी संपर्क साधलेला नाही. या सेटवर चुकीची आणि अपमानस्पद वागणूक मिळत असल्याची गोष्ट देखील तिने बोलून दाखवली. तर, इतर कलाकारांच्या आरोपांवर देखील तिने आपलं मत व्यक्त केलं.
संबंधित बातम्या