छोट्या पडद्यावरची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या प्रवासात अनेक कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र, आता प्रेक्षकांची काही आवडती पात्र या मालिकेत परतून येत आहेत. मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. याबाबत दयाबेनच्या भावाने माहिती दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जेठालाल सुंदरलाल याला दया पुन्हा घरी कधी येणार? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. सध्या दया ही सुंदरलालकडे अहमदाबदला आहे. त्यामुळे ती अहमदाबाद येथून गोकुळधाममध्ये दया परत कधी येणार असे जेठालाल विचारतो. सुंदरलाल त्यावर सांगतो की, 'कधी दया घरी पुन्हा परतणा. यंदाच्या दिवाळीत दिवे माझी बहीणच लावेल. मी दिवाळी सांगत आहे, पण माझी बहीण त्याआधी देखील गोकूळधाममध्ये येऊ शकते.'
वाचा: जागतिक इमोजी दिवसानिमित्त शिल्पा शेट्टीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
सुंदरलालने दिलेल्या माहितीनंतर गोकुळधाम रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दया ही दिवाळी किंवा त्याआधी मालिकेत परतणार असल्याचे समोर आले आहे. आता चाहते दयाची परतण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.
‘दयाबेन’ साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकाणी हिने २०१७मध्ये पहिल्या मुलीच्या जन्मावेळी या मालिकेतून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून ती या शोमधून गायब आहे. गेल्यावर्षी देखील ती मालिकेत परतेल अशी चर्चा सुरू होती. मात्र, नुकताच तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती परतणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.