TMKOC Actress Navina Bole Divorce: 'इश्कबाज' फेम नवीना बोले ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'इश्कबाज' मालिकेतील 'तिया' या व्यक्तिरेखेतून नवीना बोले हिला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'बावरी' या व्यक्तिरेखेमुळेही नवीना प्रसिद्ध झाली होती. नवीना 'मिले जब हम तुम' आणि 'जिनी और जुजू' सारख्या अनेक टीव्ही शोमध्येही दिसली होती. दरम्यान, आता नवीना बोले हिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
'इश्कबाज' अभिनेत्रीच्या वैवाहिक जीवनात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे तिचे सात वर्षे जुने वैवाहिक जीवन धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पती जीत करणपासून ती विभक्त झाली. नवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
नवीना बोले हिने २०१७ मध्ये अभिनेता-निर्माता जीत करणसोबत लग्न केले होते. लग्नानंतर नवीनाने २०१९मध्ये मुलगी किमायराला जन्म दिला. तर, आता त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवीनाने नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पती जीत करणपासून विभक्त झाल्याची पुष्टी केली. तीन महिन्यांपूर्वी ती पती जीतपासून विभक्त झाली होती. आता आम्ही लवकरच कायदेशीर कार्यवाही सुरू करू आणि अधिकृत घटस्फोट घेऊ, असे तिने म्हटले आहे. ‘विभक्त झाल्यानंतरही जीत आणि मी आमच्या पाच वर्षांच्या मुलीचे संगोपन एकत्र करणार आहोत आणि जीत आठवड्यातून दोन दिवस आपल्या मुलीसोबत घालवणार आहे. आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत’, हे तिने स्पष्ट केले.
अभिनेत्री नवीना बोले हिला जेव्हा जीतसोबतचे लग्न तुटण्याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा तिने यावर मोकळेपणाने उत्तर दिले नाही. मात्र, ‘सुरुवातीला आमच्या लग्नात सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण नंतर सर्व काही बदलले’, असे तिने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले. ‘आमच्या मुलीसाठी आम्ही आमचे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काहीही चांगले झाले नाही. त्यामुळं आम्ही शांतपणे आणि परस्पर संमतीने वेगळं व्हायचं ठरवलं.’ अभिनेत्री म्हणाली की, ही तिची कौटुंबिक बाब आहे आणि सध्या दोघांमध्ये तणाव आहे. अशा परिस्थितीत तिला या प्रकरणावर काही प्रायव्हसी हवी आहे.