Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेबाबत अशी बातमी समोर आली होती की, या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणाऱ्या शरद सांकलाने या मालिकेचा निरोप घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता खुद्द शरद सांकला यांनी या बातमीवर मौन सोडले आहे. त्यांनी ही बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण हा शो सोडत नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. खरं तर, शोच्या नव्या एपिसोडमध्ये अब्दुलच्या अनुपस्थितीमुळे त्याने शोचा निरोप घेतल्याची अफवा पसरू लागली होती.
ई-टाइम्सशी खास बातचीत करताना शरद म्हणाला की, ‘मी शो सोडणार असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. मी कुठेही जाणार नाही आणि मी या कार्यक्रमाचा भाग आहे. या मालिकेचे कथानक असे आहे की, सध्या त्यात माझी व्यक्तिरेखा नाही. पण आता अब्दुल लवकरच परत येणार आहे’, असे तो म्हणाला. पुढे शरद म्हणाला की, ‘हा कथानकाचा भाग आहे. हा इतका गोड आणि दीर्घकाळ चालणारा शो आहे. मुख्य म्हणजे मी माझ्या व्यक्तिरेखेसाठी ओळखला जातो, ही एक मोठी संधी आहे. असं असताना मी हा शो का सोडणार? मी शो सोडण्याचा विचारही करू शकत नाही.’
अब्दुल पुढे म्हणाला की, ‘नीला टेलिफिल्म्स प्रॉडक्शन हाऊस माझ्या कुटुंबासारखी आहे आणि निर्माते असित मोदी माझे कॉलेज मित्र आहेत, मी हा शो सोडण्याचा विचार कधीच करणार नाही. जोपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील, तोपर्यंत मी त्याचा भाग राहणार आहे. आजच्या एपिसोडबद्दल बोलायचे झाले, तर गोकुळधामचे लोक अब्दुलच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.’
गोली अब्दुलच्या परत येण्यासाठी एक प्रतिज्ञा करतो की, अब्दुल परत येईपर्यंत तो काहीही खाणार नाही. त्याचवेळी भिडे कुटुंबीय अब्दुलच्या परत येण्यासाठी प्रार्थना करताना दिसणार आहे. दरम्यान, इन्स्पेक्टर चालू पांडे यांचा फोन येणार आहे. या कॉलमुळे भिडे यांना अब्दुल सापडला असे वाटेल, पण चालू पांडे गोकुळधाम सोसायटीत एकटेच येणार आहेत. मात्र, एपिसोड संपल्यानंतर अब्दुल स्वत:हून गोकुळधाम सोसायटीत परत येणार आहे. त्यामुळे गोकुळधाम सोसायटीत आता पुन्हा एकदा आनंदी आनंद दिसणार आहे.