‘पंडित जी कहते हैं…’ लेखक दिनेश पंडित कोण आहेत? हे कोणालाच ठाऊक नाही, पण लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्याची ताकद त्यांच्या पुस्तकात मात्र आहे. 'हसीन दिलरुबा' चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांना हे कळलं असेलच. आता तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांच्या 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटात दिनेश पंडितने असंच काहीसं केलं होतं. पण हा नवा ट्विस्ट नेमका काय आहे? हा ट्विस्ट चांगला आहे की वाईट, हे 'फिर आई हसीन दिलरुबा'चा रिव्ह्यू वाचल्यानंतरच कळेल.
राणी कश्यप (तापसी पन्नू) आणि रिशू सक्सेना (विक्रांत मेसी) हरिद्वार येथील ज्वालापूरमधून पळून जातात. त्यानंतर ते प्रेमाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रा शहरामध्ये स्थायिक होतात. पण पोलिसांच्या भीतीमुळे ते एकत्र राहू शकत नाहीत. राणी एक विधवा स्त्री म्हणून आयुष्य जगत असते. तर रिशू पैसे कामावण्यासाठी मुलांना शिकवत असतो. रिशू एका दलालाशी व्यवहार करतो आणि राणीसोबत देश सोडण्याचा प्लॅन करतो. तेवढ्यात राणीच्या आयुष्यात अभिमन्यू (सनी कौशल)ची एण्ट्री होते आणि कथा पूर्णपणे बदलते. त्यांच्या आयुष्यात एक नवे संकट उभे राहते. नीलचे काका (जिमी शेरगिल) यांच्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. त्यानंतर खरा थ्रिल सुरु होतो.
तापसी पन्नूचा अभिनय तुम्हाला तिचं कौतुक करायला भाग पाडेल. साधा विक्रांत जेव्हा प्रेमासाठी वेडेपणाची मर्यादा ओलांडतो, तेव्हा चित्रपटाची मजा द्विगुणित होते. सनी कौशलच्या व्यक्तिरेखेबद्दल जास्त काही सांगू शकत नाही कारण त्याची व्यक्तिरेखा चित्रपटात पाहातान खरा सस्पेन्स उलगडत जातो. तसेच नीलचे काका म्हणजेच जिमी शेरलगीलची एण्ट्री होताच कथा एका रंजक वळणावर येते. एक वेगळेच वातावरण तयार होते. मात्र हे पात्र तितके शातिर आणि भीतीदायक वाटत नाही. याचे कारण जिमीचा अभिनय नसून लेखनातील दोष आहे. या पात्राला हवे तसे डायलॉग देण्यात आलेले नाहीत.
या चित्रपटाची खासियत ही त्याची पंचलाइन आहे. प्रेमाच्या या खेळात राणी जेव्हा हारते तेव्हा तिच्या तोंडून निघते की, ‘पता है पंडित जी क्या कहते हैं…’ या एका डायलॉगने चित्रपटाची कथा आणखी रंजक झाली आहे. पण जेव्हा रिशू आणि अभिमन्यू दोघेही पंडितचे डायलॉग बोलू लागतात तेव्हा खरी मजा येते.
चित्रपटाचे बॅकग्राउंड म्यूझिक हवे तितके मनाला स्पर्श करत नाही. अभिमन्यूची जेव्हा जेव्हा एण्ट्री होते तेव्हा तेव्हा जर बॅकग्राऊंड म्यूझिक दमदार वाजवले असते तर सिनेमाच्या सस्पेन्सची पातळी आणखी वाढली असती. पण यामध्ये दिग्दर्शक अपयशी ठरला आहे.
संपूर्ण चित्रपट हा सस्पेंसने भरलेला आहे. चित्रपट पाहाताना जेव्हा वाटते की आता कथा संपली तेवढ्यात एक नवा ट्विस्ट येतो. तसेच क्लायमॅक्समध्ये जे सीन दाखवण्यात आले आहेत ते चकीत करणारे आहेत.
जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलरची आवड असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही 'हसीन दिलरुबा' पाहिला असेल तर 'फिर आई हसीन दिलरुबा' जरूर पाहा. 'हसीन दिलरुबा'ची गोष्ट आठवत नसेल तर आधी बघा आणि मगच बघा कारण दोघांची कथा एकमेकांशी जोडलेली आहे.