बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट आज २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून चाहते या ऐतिहासिक बायोपिक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता आज 'स्वातंत्र्यवीर सावरकर' प्रदर्शित होत आहे, तर हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' मधून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट वीर सावरकर यांचा बायोपिक आहे, ज्यांची भूमिका स्वतः रणदीप हुड्डा साकारणार आहे. अंकिता लोखंडे ही त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा पहिला दिवस कसा राहील आणि चित्रपट किती कमाई करेल याचा अंदाज आता चित्रपट व्यापार विश्लेषक बांधताना दिसत आहेत. काही चित्रपट विश्लेषकांच्या मते, रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पहिल्या दिवशी १ ते २ कोटी रुपये कमवू शकतो. आउटलुकच्या रिपोर्टनुसार, हा सध्याचा अंदाजे आकडा आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ देखील होऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणदीप हुड्डा याने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' बनवण्यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी त्याने आपले घर देखील विकले. घर विकून त्यांनी हा चित्रपट बनवला. नुकताच रणदीपचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता, ज्यामध्ये अभिनेत्याचे वजन खूपच कमी झालेले दिसत होते. रिपोर्ट्सनुसार, रणदीप हुड्डाने विनायक दामोदर सावरकर बनण्यासाठी तब्बल ३० किलो वजन कमी केले होते.
रणदीप हुड्डा याची बहीण डॉ. अंजली हुड्डा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, भाऊ रणदीपचे परिवर्तन पाहून त्यांची आई खूप भावूक झाली होती, तर वडील संतापले होते. वडिलांनी तर रणदीपला काम थांबवण्यास सांगितले होते. तर, आई म्हणायची की, मी माझ्या मुलाला असे पाहू शकत नाही. रणदीप हुड्डा अक्षरशः संगाड्यासारखा दिसत होता. विशेष मेहनतीने बनवलेल्या या चित्रपटाकडून रणदीप हुड्डाला खूप अपेक्षा आहेत.
संबंधित बातम्या