चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९७व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. जगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ऑस्कर अवॉर्ड्स' मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. यंदा ऑस्कर २०२५साठी भारताकडून 'लापता लेडीज' या चित्रपटाची निवड केल्याची माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दिली. त्या पाठोपाठ आता एका मराठी चित्रपटाची देखील ऑस्करच्या शर्यतीमध्ये एण्ट्री झाली आहे.
ऑस्करच्या शर्यतीमध्ये एण्ट्री करणारा चित्रपट म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके.' फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून २९ चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतले गेले होते. त्यात योगेश देशपांडे दिग्दर्शित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे. त्यामुळे आता मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे.
'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी. संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. प्रेक्षकांसह श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिथेही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाले.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा
ऑस्करसाठी 'लापटा लेडीज' या चित्रपटाची जवळपास २९ चित्रपटांमधून निवड करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील हिट चित्रपट 'अॅनिमल', मल्याळम राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'आट्टम', कान्स पुरस्कार विजेता 'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' चित्रपट, तमिळ चित्रपट 'महाराजा', तेलुगू सिनेमा 'कल्की २८९८ एडी', बॉलिवूड चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर', 'आर्टिकल ३७०' आणि इतर काही हिट चित्रपटांचा समावेश होता.