राजधानी दिल्लीपासून मुंबईपर्यंत खळबळ उडवून देणाऱ्या एका हत्या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ६ महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचे गूढ उलगडत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिल्लीतील भीषण हत्याकांडात ज्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत, त्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. आरोपी तरुण आफताबने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसी श्रद्धाचा आधी गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केले. त्यानंतर एक एक करून सर्व अवयव दिल्लीच्या जंगलात टाकला. या घटनेविरोधात जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
स्वराही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने श्रद्धा प्रकरणावर प्रतिक्रिया देत एक ट्वीट केले आहे. "हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे. याविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यानेच आपल्यासोबत असे वागणे अतिशय वाईट आहे. या घटनेविषयी ऐकून मला प्रचंड त्रास झाला. आशा आहे की पोलीस त्यांचा तपास त्वरीत पूर्ण करतील आणि या राक्षसाला योग्य ती कठोर शिक्षा देतील" या आशयाचे ट्वीट करत स्वराने संताप व्यक्त केला आहे.
वाचा : “मुलींनी ...", श्रद्धा वालकर प्रकरणावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
श्रद्धा मुळची महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील होती. मुलीच्या शोधासाठी तिचे वडील पालघर येथूनदिल्लीत आले. ते श्रद्धाच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्याला कुलूप होते. त्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून मुलीच्या नात्याबाबत पोलिसांना सांगितले आणि बेपत्ता होण्यामागे आफताबचा हात असावा असा संशय व्यक्त केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आफताबचा शोध सुरू केला आणि त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.चौकशीत आफताबने आपला गुन्हा मान्य केला. त्याने सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.