बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करने एक दिवस अचानक लग्न केल्याची माहिती दिली. तिने सोशल मीडियावर फहाद अहमदसोबतच्या लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली. स्वरा हिंदू आहे आणि फहाद मुस्लीम आहे. दोघांची पार्श्वभूमी आणि संस्कृती यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले गेले. आता स्वराचा पती फहादने त्याच्या घरी जेव्हा हिंदू मुलीशी लग्न करत आहे हे कळाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती याविषयी सांगितले आहे.
एका पॉडकास्टदरम्यान फहादने सांगितले की, तो बरेलीच्या एका छोट्याशा गावात राहातो. त्याची आई टीव्ही पाहात नाही आणि स्वरालाही ओळखत नाही. मुलाला हिंदू मुलीशी लग्न करायचे आहे, हे कळल्यावर त्याची आई अस्वस्थ झाली.
आरजे अनमोलच्या पॉडकास्ट कपल ऑफ थिंग्जमध्ये स्वरा भास्करने पती फहाद अहमदसोबत आली होती. त्यावेळी फहाद त्याच्या कुटुंबीयांविषयी सांगताना दिसला. तो म्हणाला, "मी ज्या कुटुंबातून आलो आहे, त्या कुटुंबात असताना मलाही भीती वाटत होती की मी एका हिंदू मुलीशी लग्न करतोय. माझी द्विधा मनस्थिती झाली होती. त्यावेळी मी स्वराच्या घरी राहात होतो. मी तिला सांगितले की वॉक करुन येतो. मी विचार केला वॉकला गेल्यावर अम्मीशी बोलून घेतो. मी अम्मीला आधी सांगितले होते की मला लग्न करायचे नाही. पीएचडी करेन आणि मग बघूया. त्याच काळात माझ्यासाठी एक स्थळ आले होते. ते लोक म्हणाले होते की फक्त हो म्हण. लग्न जेव्हा करायचे तेव्हा करु. यामध्ये माझी खाला होती" असे फहाद म्हणाला.
पुढे फहाद म्हणाला, 'अम्मीने मला फोन केला की लोक आग्रह करत आहेत. कारण त्यांनी तुला टीव्ही आणि सोशल मीडियावर पाहिले आहे. त्यांची इच्छा आहे की तू होकार द्यावा. लग्न भलेही नंतर कर. पुढे अम्मी म्हणाली की नंतर आपण कारण काढू की हे खालच्या जातीचे आहेत. त्यामुळे लग्न केले नाही.'
फहादने सांगितले की त्यांच्या कुटुंबाची ओळख ही राजकीय आणि कोणताही भेदभाव न करणारे कुटुंब म्हणून केली जाते. मी रागात अम्मीला म्हणालो की मी हिंदू मुलीशी लग्न करण्याचा विचार करत आहे आणि तुम्ही त्या मुलीला खालच्या जातीची आहे म्हणून नकार देत आहात. हे ऐकून माझ्या आईला धक्का बसला. तिने माझ्या बहिणींना फोन केला.
वाचा: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
फहाद म्हणाला, 'माझी आई टीव्ही पाहत नाही, स्वरा भास्कर कोण आहे हे तिला माहित नव्हते. बहिणींनी स्वराचे बोलणे ऐकले होते. जर एखादा हिंदू एखाद्या मुसलमानासाठी बोलत असेल तर मुस्लिम त्याला सर्वस्व मानतात. इथले लोक मॉब लिंचिंग पाहतात, ट्रेनमध्ये कोणी कुणाची दाढी ओढतात ही भीती आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. म्हणूनच माझ्या बहिणींना स्वरा आवडली होती. यानंतर स्वराला लग्न करायचे हे निश्चित झाले होते.'