इस्त्रायलच्या गाझा पट्टीत इस्राइली लष्कर आणि हमास या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांदरम्यान गेले दोन दिवस सुरु असलेल्या सशस्त्र चकमकीत आत्तापर्यंत तब्बल १००० पेक्षा अधिक जण ठार झाल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जग हादरले आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हमासला पाठिंबा दिल्याने सर्वजण चकीत झाले आहेत.
स्वराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने इस्राइलबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या लोकांना 'ढोंगी' असे म्हटले आहे. “जेव्हा इस्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला होता. पॅलेस्टीनी लोकांची घरे जाळून राख झाली होती. तिथल्या लहान मुलांवरही त्यांनी दया केली नाही. १० वर्षांपासून त्यांनी गाझावर कित्येक बॉम्बहल्ले केले. तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. त्यामुळेच इस्राइलवर झालेल्या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणारी मंडळी मला ढोंगी वाटतात” या आशयाची पोस्ट स्वराने केली आहे.
वाचा: इस्राइलच्या धुमश्चक्रीत अडकली बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा; टीमचा संपर्कही होईना!
सध्या सोशल मीडियावर स्वरा भास्करची ही पोस्ट व्हायरल झाली असून चर्चेत आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत स्वराला सुनावताना दिसत आहे. मात्र, स्वराला या सगळ्या गोष्टींचा कधीही फारसा फरक पडत नाही. ती बिनधास्त पणे तिचे मत मांडताना दिसते.
शनिवारी ‘हमास’ अतिरेक्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात ६०० इस्राइली नागरिक ठार झाले असल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने लष्करी सूत्रांच्या आधारावर दिले आहे. हा अधिकृत आकडा नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. सध्या गाझा पट्टीच्या सीमेवरील सात गावे आणि लष्करी तळांवर लष्कर आणि हमासच्या अतिरेक्यांसोबत चकमक सुरू आहे. इस्राइली लष्कराचे रणगाडे गाझा पट्टीच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या