मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी ओळखला जातो. स्वप्निल त्याच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. नुकताच स्वप्निलने सोशल मीडियावर रेल्वे प्रवासातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले असून या फोटोवर त्याने विमान प्रवास करत असल्याची भावना मनात येत असल्याचे म्हटले आहे. नेमके असे काय झाले की स्वप्निलला विमान प्रवास करत असल्याचे वाटले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
स्वप्निल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'नवरा माझा नवसाचा २'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निलला कोकणात जायचे होते. कोकणात जाण्यासाठी त्याने एका कोकण रेल्वेची निवड केली. या रेल्वेमधील सोयी-सुविधा आणि स्वच्छता पाहून स्वप्निल जोशीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत कोकण रेल्वेचे कौतुक केले. त्याने हे रेल्वेमधील फोटो शेअर करुन विमानात बसल्याची भावना येत असल्याचे सांगितले आहे.
वाचा: त्या चित्रपटाच्या वेळी माझं ब्रेकअप झालं; प्राजक्ता माळीचे खासगी आयुष्यावर वक्तव्य
स्वप्निलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये कोकण रेल्वेचा डब्बा दिसत आहे. या डब्बा अतिशय स्वच्छ दिसत आहे जणू काही विमानातील सीट आहेत. या फोटोंमध्ये स्वप्निलसोबत अभिनेते आणि 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावर देखील दिसत आहे. रेल्वेतील डब्ब्याचा फोटो शेअर करत स्वप्निलने तीन-चार हॅशटॅग वापरले आहेत. त्यामध्ये मला अभिमान वाटतोय, विमानातून प्रवास केल्याची भावना येतेय असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर स्वप्निलची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: असले फालतू उपदेशाचे डोस...; 'घरोघरी मातीच्या चुली'वर प्रेक्षकांचा संताप
'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट तुफान हिट ठरल्यानंतर आता सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत स्वप्निल जोशी, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, वैभव मांगले, निर्मिती सावंत, संतोष पवार, अली असगर, हेमल इंगळे हे कलाकार दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे कोकणात चित्रिकरण सुरु झाले आहे. आता प्रेक्षकांमध्ये 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता पाहायला मिळते.
संबंधित बातम्या