मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मला पांडुरंग भेटला! स्वप्नील जोशीने सांगितला पहिल्या वारीचा हृदयस्पर्शी अनुभव

मला पांडुरंग भेटला! स्वप्नील जोशीने सांगितला पहिल्या वारीचा हृदयस्पर्शी अनुभव

Payal Shekhar Naik HT Marathi
Jul 08, 2022 01:52 PM IST

आयुष्यात एकदा तरी वारी करावी असं म्हणतात हे काही खोटं नाही असं म्हणत स्वप्नील जोशीने (swapnil joshi)त्याचा वारीचा अनुभव शेअर केला आहे.

स्वप्नील जोशीने सांगितला पहिल्या वारीचा अनुभव
स्वप्नील जोशीने सांगितला पहिल्या वारीचा अनुभव

शहाण्या माणसाने आयुष्यात एकदा तरी पांडुरंगाच्या वारीचा अनुभव घ्यावा असं म्हणतात. आयुष्यात वारी केली नाही तर तुम्ही आयुष्य जगाला नाहीत असं म्हणतात हे काही खोटं नाही याचा अनुभव लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi)याला देखील आला आहे. स्वप्नील पहिल्यांदाच वारीला गेला आणि आपल्याला पांडुरंग भेटला असं म्हणत त्याने चाहत्यांसोबत त्याच्या वारीचा अनुभव शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत त्याने त्याच्या वारीचा किस्सा सांगितला आहे. वारीत गेल्यावर मनाची मरगळ देखील निघून जाते असं त्याने म्हटलं आहे.

आम्ही तर पिक्चरमधले हिरो, खरे हिरो तर हेच आहेत असं म्हणत स्वप्नीलने लिहिलं, 'मला पांडुरंग असा भेटला! जय हरी विठ्ठल! पायीवारी, काल वाखरी ते पंढरपूर पायी वारी चाललो! अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली! कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे ! बघू, पांडुरंग कधी संधी देतो! पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही ! आम्ही पिक्चर मधले हिरो! पण खरे हिरो हे वारकरी! वर्षानुवर्षे तहान भूक विसरून, पायी वारी चालतात! पायाला सूज येते, पण मनाची, विचारांची सूज कायमची निघून जाते! त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं!'

पुढे स्वप्नीलने लिहिलं, 'आमच्या टीमने वारी मध्ये जे काम केलं आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, हरवलेल्या वस्तूंसाठीचे स्टॉल असतील, ते पाहून खूप आनंद झाला! मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा अभिमान आहे ! लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत! हा "प्रवास" प्रत्येकाने एकदा तरी करावाच! माझी आजी म्हणायची..."तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत !" काल मला कळलं ती काय म्हणायची! जय हरी विठ्ठल!' स्वप्नीलची ही पोस्ट सोशल मीडियावर वायरल झाली आहे.

WhatsApp channel