मराठी चित्रपटसृष्टीमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. तो कायमच त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो. सध्या स्वप्नील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवी लग्झरी कार खरेदी केल्याचे सांगितले आहे. खरं तर स्वप्नीलने एक सुंदर असे पत्र लिहून पोस्ट केले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.
स्वप्नील जोशीने नव्या गाडीचा फोटो अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वप्नीलने नवीकोरी रेंज रोव्हर डिफेंडर गाडी खरेदी केल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने एक सुंदर पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. स्वप्नीलने खरेदी केलेल्या लँड रोव्हर रेंज रोव्हर डिफेंडर या गाडीची किंमत जवळपास दीड कोटी ते अडीच कोटी रुपये असावी.
स्वप्नीलने पत्राची सुरुवात ही, "डिअर जिंदगी! आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या प्रियजनांसाठी खूपच खास आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासातील हा सर्वात मोठा अभिमानास्पद क्षण आहे. माझ्या बाबांच्या हातात नव्या डिफेंडर गाडीच्या चाव्या पाहून खरंच मन भरून आले. आपण आयुष्यात खरंच खूप पुढे आलो आहे… मी हे सगळं मिळवू शकेन की, नाही? याबाबत अनेकांच्या मनात आधी शंका होती. पण, हे सगळं माझ्या कुटुंबीयाच्या साथीने शक्य झाले आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आई-बाबांनी मला आत्मविश्वास दिला" असे म्हणत केला आहे.
पुढे तो म्हणाला, "ही डिफेंडर फक्त कार नाही. हे मी आजवर केलेल्या कामाचे प्रतीक आहे. माझ्या आई-बाबांच्या मेहनतीचे फळ आहे. आयुष्यात काहीच कठीण नाही. तुम्ही फक्त प्रयत्न केले पाहिजेत हे ही गाडी कायम दर्शवेल. तुमचे पॅशन, इच्छाशक्ती आणि प्रियजनांच्या साथीने तुम्ही कोणतीही गोष्टी ‘डिफेंड’र करू शकता. डिअर जिंदगी, ही फक्त एक सुरुवात आहे. या प्रवासात आणखी अनेक चढउतार पाहायचे आहेत. आयुष्यात आणखी खूप गोष्टी करायच्या आहेत. आता येणारा प्रत्येक दिवस मला काही ना काही नवीन शिकवून माझ्या एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे."
स्वप्नील जोशीने सोशल मीडियावर नव्या लग्झरी गाडीचा व्हिडीओ पोस्ट करताच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी स्वप्नीलच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तर स्वप्नीलचा मित्र परिवार अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, अभिनेता संग्राम चौघुले, धैर्य घोलप आणि इतर काही कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक
काही दिवसांपूर्वी स्वप्नील जोशीचा ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ जाधव आणि इतर काही कलाकार दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता स्वप्नील 'जिलबी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रसाद ओक आणि शिवानी सुर्वेसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
संबंधित बातम्या