सोशल मीडियावर मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्यामध्ये संवाद सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. दोघे एकमेकांच्या चित्रपटाविषयी कौतुक करत होते. त्या दोघांचे नेमके काय सुरु आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले आहे. कारण स्वप्नील आणि प्रसाद हे दोघेही एका चित्रपटात काम करणार आहेत.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या आगामी चित्रपटाचे नाव सुशीला-सुजीत’ आहे. पहिल्यांदाच स्वप्नील आणि प्रसाद हे एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. अद्याप या चित्रपटाचे पोस्टर किंवा टीझर समोर आलेला नाही.
प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून स्वप्नील जोशीचे कौतुक केले होते. ‘नवरा माझा नवसाचा २’ नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसाद ओकने स्वप्नीलचे कौतुक केले आणि त्यानंतर स्वप्नील जोशीने प्रसाद ओकच्या २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर २’साठी खास शुभेच्छा दिल्या. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र आहेत. समाजमाध्यमांवर त्यानंतर हे दोघे रुपेरी पडद्यावर एकत्र यायला हवेत आणि त्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहोत अशा प्रतिक्रिया रसिकांकडून या पोस्टनंतर उमटल्या. लगेचच प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होत आहे.
‘सुशीला-सुजीत' चित्रपटात प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. प्रसाद ओक या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तसेच कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव या चार चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आता त्याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी प्रसादने रमा माधव, बाळकडू, चिरंजीव, फर्झंद, क्षण, ती रात्र, एक डाव धोबीपछाड, हिरकणी, धर्मवीर यांसारख्या चित्रपटात काम केले तर पिंपळपान, आभाळमाया, हम तो तेरे आशिक है, क्राईम पॅट्रोल या मालिकांमध्ये तो दिसला.
वाचा: ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका साकरणारा स्वप्नील जोशी इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. तो सध्या आघाडीचा अभिनेता आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.