Jilabi Teaser: माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज; स्वप्नील जोशीच्या 'जिलबी'चा दमदार टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jilabi Teaser: माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज; स्वप्नील जोशीच्या 'जिलबी'चा दमदार टीझर प्रदर्शित

Jilabi Teaser: माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज; स्वप्नील जोशीच्या 'जिलबी'चा दमदार टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 18, 2024 04:36 PM IST

Jilabi Teaser: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांच्या 'जिलबी' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

Jilabi Teaser
Jilabi Teaser

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील दोन नावे म्हणजे प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी. हे दोनही कलाकार आजवर आपण एकत्र काम करताना पाहिले नाहीत. आता त्यांचा 'जिलबी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

काय आहे चित्रपटाचा टीझर?

'जिलबी' चित्रपटाच्या टीझरमध्ये घटना-प्रसंगांतून निर्माण झालेले गूढ उकलताना उद्योगपती सौरव सुभेदार डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकर याची मदत घेतात. यातील पोलीस अधिकारी विजय करमरकर याची भूमिका स्वप्नील साकारणार आहे. ‘मला ना गोल गोल फिरवता येत नाही’ मी डायरेक्ट पॉईंट वर येतो. ‘एकदा सुरू झालं ना..की मुळासकट सगळं बाहेर निघेल..! अशा दमदार संवादांसह जिलबी सिनेमाचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदा एकत्र

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक या दोन आघाडीच्या कलाकारांनी एकत्र सिनेमात दिसावं असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटत असते. आता 'जिलबी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी प्रसाद ओकचे सिक्रेट सर्वांसमोर आणणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

आनंद पंडित निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. या चित्रपटात स्वप्नील आणि प्रसादसोबत अभिनेत्री शिवानी सुर्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत.
वाचा: 'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला

प्रसाद ओकने ‘जिलबी’ सिनेमातील भूमिकेविषयी आनंद व्यक्त केला आहे. तो आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला, “वेगवेगळया भूमिका आणि उत्तम कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. ‘जिलबी’ च्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. अत्यंत रुबाबदार, सगळ्या क्षेत्रात दबदबा आणि मानसन्मान असेलला उद्योगपती सौरव सुभेदार करताना मला ही तितकीच मजा आली. गोड आणि गूढ असे दोन्ही स्वाद देणारी ‘जिलबी’ प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.”

Whats_app_banner