Man Yedyagat Zala Trailer Out: दिवंगत दिग्गज मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. स्वानंदी बेर्डे अभिनेता सुमेध मुद्गलकर याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'मन येड्यागत झालं' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या चित्रपटासाठी लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रिया बेर्डे व बहिणीला पाठिंबा देण्यासाठी अभिनय बेर्डे उपस्थित होता. दरम्यान, प्रिया बेर्डे यांनी लेकीचं कौतुक करत तिला सपोर्ट केला.
स्वानंदी बेर्डेच हे चित्रपटातील पहिलं पदार्पण असून तिच्यासह तिच्या कुटुंबालाही चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिकेनंतर अभिनेता सुमेध मुदगलकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
योगेश जाधव दिग्दर्शित 'मन येड्यागत झालं' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा अगदी दिमाखात संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार मंडळी आणि चित्रपटाची इतर टीम उपस्थित होती. ट्रेलर लाँच सोहळ्याला कलाकारांचा द्विगुणित झालेला आनंद पाहून चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता पाहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेत्री स्वानंदी बेर्डे व अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, स्वानंदीला सपोर्ट करण्यासाठी तिची आई व भावाने या सोहळ्याला हजेरी लावली होती.
प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा या चित्रपटाचा २ मिनिटे २२ सेकंदचा हा ट्रेलर रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. प्रेम म्हणजे नक्की काय असतं, हे तरुण पिढीमार्फत दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून प्रेमाचे अनेक कंगोरे पाहायला मिळत आहेत. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वानंदी व सुमेध यांचं प्रेम जुळणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहातच जावं लागणार आहे. येत्या १ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर, कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर, चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या