Somy Ali On Sushant Singh Rajput Death Case : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली नेहमीच चर्चेत असते. मनोरंजन विश्वापासून दूर असणारी सोमी सध्या रोजच अनेक धक्कादायक दावे करत आहे. सर्वप्रथम सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दल तिने अनेक धक्कादायक दावे केले होते. दरम्यान, आता तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.
सोमी अली हिने रेडिटवर नुकतेच ‘आस्क मी एनीथिंग’ (एएमए) सत्र आयोजित केले होते. या सत्रादरम्यान सोमीला विचारण्यात आलं की, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर तुमचं काय मत आहे? बॉलिवूडने त्याला ज्या प्रकारे घेरले ते खरोखरच निराशाजनक आहे.’ यावर उत्तर देताना सोमी म्हणाली की, ‘सुशांतची हत्या करण्यात आली. पण त्याचे रुपांतर आत्महत्येत करून सगळ्यांना दाखवण्यात आले. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांना विचारा, ज्यांनी शवविच्छेदन अहवाल बदलला. त्यांचा शवविच्छेदन अहवाल का बदलला हेही विचारा!’
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू चार वर्षांपूर्वी झाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी एम्स मेडिकल बोर्डाने सुशांतच्या मृत्यूत हत्येची शक्यता फेटाळून लावली होती. त्यांनी याला 'गळफास आणि आत्महत्येचे प्रकरण' असे म्हटले आहे. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता यांनीही सुशांतच्या शरीरावर फासावर लटकण्याशिवाय दुसरे कोणतेही चिन्ह नसल्याचे म्हटले होते. फॉरेन्सिक डॉक्टरांच्या सहा सदस्यीय टीमने 'विषप्रयोग आणि गळा दाबून मारल्याचा' आरोप फेटाळला होता.
याशिवाय सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडला विचारण्यात आले की, 'तुम्ही पूर्वीच्या नात्यांकडे आता कसे पाहता? आयुष्याच्या या टप्प्यात तुम्हाला कोणत्या न्यायाची अपेक्षा आहे? यावर अभिनेत्री सोमी अली म्हणाली की, ‘एसएसआर, जिया खान आणि इतरांना न्याय हवा आहे. रवींद्र पाटील यांचे काय? त्यांचे काय झाले ते गुगलवर पहा.’ रवींद्र पाटील हा सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातील मुख्य साक्षीदार होता आणि त्याने मुंबई पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. एलिट कमांडो पथकासाठी त्याची निवड झाली. त्याला सलमानच्या सुरक्षेत ठेवण्यात आले होते. हिट-अँड-रन प्रकरणात त्याने साक्ष दिली की, सलमान गाडी चालवत होता आणि दारूच्या नशेत होता. मात्र, त्यानंतर त्याचे आयुष्य बदलून गेले. अतिशय विचित्र अवस्थेत त्याचा मृत्यू झाला होता.