Sushant Singh Rajput Birth Anniversary : टीव्हीच्या दुनियेतून मोठ्या पडद्यावर प्रवेश करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतची आज जयंती आहे. या अभिनेत्याचा चित्रपट प्रवास अतिशय अद्भुत होता. तरुण वयात मोठे पराक्रम गाजवणाऱ्या सुशांतने त्याच्या करिअरच्या शिखरावर असताना जगाचा निरोप घेतला. सुशांत हा अभिनय विश्वातील एक उगवता तारा होता. पण, त्याने आपले आयुष्य का संपवले याचे कारण कुणालाच कळले नाही. अभिनेता म्हणून सुशांत दमदार होताच, पण एक व्यक्ती म्हणून त्याच्यात अनेक गुण होते.
सुशांतच्या अभिनयाचं तर खूप कौतुक आहे. पण, तो केवळ अभिनयातच नाही तर अभ्यासातही अव्वल होता, याचा पुरावा म्हणजे तो इंजिनिअरिंगचा सर्वात हुशार विद्यार्थी देखील होता. खुद्द सुशांतने एकदा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये याबद्दल सांगितले होते. सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. चार बहिणींचा तो एकुलता एक आणि लाडका भाऊ होता. लहानपणापासूनच अभ्यासात पुढे असलेल्या सुशांतच्या डोळ्यात कुठेतरी अभिनयाचं स्वप्न होतं.
सुशांत सिंह राजपूतने आपले अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडले आणि अभिनेता होण्याचा निर्णय घेतला आणि एका नवीन मार्गावर निघाला. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'पवित्र रिश्ता'मधून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तो घराघरात लोकप्रिय झाला. या शोदरम्यानच त्याची को-स्टार अंकिता लोखंडेसोबत त्यांचे नाव जोडले जाऊ लागले आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. पण, नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. २०१३मध्ये, अभिनेता मोठ्या पडद्याकडे वळला आणि 'काई पो चे' या चित्रपटाद्वारे त्याच्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरू केला. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी 'पीके', 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी', 'शुद्ध देसी रोमान्स', 'केदारनाथ', 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' आणि 'सोनचिरिया' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
सुशांतला खगोलशास्त्राची खूप आवड होती. त्याच्याकडे एक प्रगत दुर्बीण होती ज्याद्वारे तो चंद्र आणि ताऱ्यांचे निरीक्षण करत असे. चंद्रावर जमीन विकत घेणारा तो पहिला भारतीय अभिनेता होता. त्याच्या या पॅशनमुळे तो इतर कलाकारांपेक्षा वेगळा ठरला. २०१८ मध्ये त्याने इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री नावाच्या वेबसाइटवरून ५५ लाख रुपयांची चंद्रावरची जमीन खरेदी केली होती. या भूमीला सी ऑफ मस्कोवी असे नाव देण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या या जमिनीचा कोणीही वारस नाही. आंतरराष्ट्रीय संस्था मानतात की चंद्र कोणत्याही एका देशाच्या ताब्यात जाऊ शकत नाही, म्हणून तिथल्या जमिनीवर कोणाचाही कायदेशीर मालकी हक्क आहे, असे मानले जात नाही.
सुशांत सिंह राजपूत हा अभिनय विश्वातील एक उगवता तारा होता, ज्याने लहान वयातच मोठी कामगिरी केली. वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी म्हणजेच १४ जून २०२० रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. कधी त्याचा खून झाला म्हटले गेले, तर कधी आत्महत्या असे संबोधले जाते. मात्र, हे प्रकरण ड्रग्जशीही जोडले गेले आणि त्यामुळे सुशांतच्या कथित गर्लफ्रेंडलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
संबंधित बातम्या