Suraj Chavan Viral Video : ‘बिग बॉस मराठी’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. यंदाच्या पाचव्या पर्वानेदेखील चाहत्यांची मने जिंकली,आणि या सीझनच्या विजेत्याच्या चर्चेने सर्वत्र उत्सुकता निर्माण केली आहे. बारामतीचा सुपुत्र आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण याने‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे विजेतेपद पटकावून महाराष्ट्रात खूपच लोकप्रियता मिळवली. त्याच्या‘झापूक झुपूक’स्टाईलने चाहत्यांवर वेगळा ठसा उमटवला आहे. आता देखील त्याने अशी गोष्ट केली आहे, जी बघितल्यानंतर सगळे त्याचे कौतुक करत आहेत.
सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर आधीपासूनच सक्रिय होता. टिकटॉक व्हिडिओंमुळे त्याने सुरुवातीस प्रसिद्धी मिळवली,मात्र काही वेळा त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अशा कठीण परिस्थितीतही सूरजने हार न मानता स्वतःला सिद्ध केलं. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेले सूरज खडतर परिस्थितीत वाढला. त्याच्या आत्याने आणि बहिणींनी त्याला सांभाळत मोठं केलं. शिक्षण घेता न आल्यामुळे व्यवहारज्ञान कमी असतानाही सूरजने आपल्या मेहनतीच्या जोरावर लोकप्रियता मिळवली आणि आज तो अनेकांचा आदर्श ठरला आहे.
सूरजने नुकतीच वसेवाडी जवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भेट दिली. त्याला पाहण्यासाठी शाळेच्या पटांगणात विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते. सूरजची एन्ट्री होताच विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. या भेटीत सूरजने मुलांशी संवाद साधत त्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूरज विद्यार्थ्यांना म्हणताना दिसतो,‘काय मग,चांगलं शिकताय ना? अजून मोठं व्हायचंय ना?मला शिक्षण घ्यायला जमलं नाही,पण तुम्ही खूप शिकून मोठं व्हा.’त्याच्या या बोलण्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
सूरज चव्हाणने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूरज विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शिकण्याचं महत्त्व पटवून देताना दिसतो. त्याच्या साध्या आणि सरळ संवादाने सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहून सूरजचं आयुष्य किती प्रेरणादायी आहे,याची जाणीव होते.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आपली ओळख निर्माण केल्यानंतर सूरज चव्हाण अधिक चर्चेत आला आहे. शोमधील त्याचा साधा आणि मनमिळाऊ स्वभाव,संघर्षाची कथा,आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्याला महाराष्ट्रभरातून मोठा पाठिंबा मिळाला. शोमधील यशानंतर सूरजने समाजातील वंचितांसाठी काम करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे.