Dhirajlal Shah Passed Away: प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन झाले आहे. सोमवारी (११ मार्च) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्माते धीरजलाल शाह यांचा भाऊ हसमुख यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असे देखील सांगितले. धीरजलाल शाह यांनी बॉलिवूडला ‘विजयपथ’, ‘खिलाडी’ आणि ‘द हिरो’ सारखे हिट चित्रपट दिले आहेत. धीरज लाल शाह यांचे भाऊ हसमुख यांनी सांगितले की, धीरजलाल यांना कोरोना झाला होता. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला. हळूहळू त्यांची प्रकृती २० दिवसांतच बिघडली. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या किडनी आणि हृदयानेही काम करणे बंद केले. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध निर्माते धीरजलाल शाह यांनी ९०च्या दशकांत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अजय देवगण स्टारर 'विजयपथ', अक्षय कुमारचा 'खिलाडी', सनी देओल, प्रीती झिंटा, आणि प्रियांका चोप्रा स्टारर 'द हिरो' यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा यात समावेश आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी निर्माते धीरजलाल शाह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी अनिल शर्मा म्हणाले की, धीरजलाल शाह हे केवळ एक चांगले निर्माताच नव्हते, तर ते एक आनंदी आणि चांगले व्यक्ती देखील होते. बॉलिवूडला त्यांनी असे काही चित्रपट दिले आहेत, जे त्यावेळच्या चित्रपट जगतात क्रांती घडवून आणल्यासारखे होते. आम्हाला नेहमीच त्यांची खूप आठवण येईल.
निर्माते हरीश सुगंधा यांनी धीरज लाल शाह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि म्हटले की, ते खूप चांगले व्यक्ती होते. यानंतर त्यांनी धीरजलाल शाह यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत म्हटले की, जवळपास सर्वच बॉलिवूड चित्रपटांचे व्हिडीओ हक्क धीरजलाल शाह यांच्याकडे होते. ‘शहेनशाह’ या पहिल्या चित्रपटाचे व्हिडीओ हक्क त्यांनी विकत घेतले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
संबंधित बातम्या