Sangeet Manapmaan Movie: विविधांगी विषयावर चित्रपट बनवण्याची परंपरा मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे. काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याच्या उद्देशाने नवनवीन संकल्पनांवर अनेक दिग्दर्शक काम करत असतात. काही संगीतमय चित्रपटांनादेखील मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली' या संगीतमय नजराण्यानंतर आता 'संगीत मानापमान' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात संगीताचा एक अद्भूद संगम पाहायला मिळणार आहे. त्यात तगडी स्टार कास्ट. चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
'संगीत मानापमान' या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, वैदेही परशुरामी आणि सुमित राघवन एकत्र दिसणार आहेत. वैदेहीचे नऊवारीतील विलोभनीय सौंदर्य आणि मराठमोळा साज तर राजबिंडा पारंपरिक पोशाख मधला सुमित राघवनचा लुक पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे. प्रेम, वीरता, शौर्य यांची गुंफण असलेले संगीत मानापमान नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची अविस्मरणीय भेट ठरणार आहे.
बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" १० जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. नुकताच सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून सुबोध भावे बरोबर सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांना एकत्र पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. त्या हा संगीतमय चित्रपट असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
'संगीत मानापमान' या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण तांत्रिक टीम या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर - एहसान - लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
'संगीत मानापमान' या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत सुमित राघवनने आनंद व्यक्त केला आहे. त्याने, “संगीतमय चित्रपट हा माझ्या आवडीचा विषय. 'कट्यार' वर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि आपल्याच अभिजात संगीताला आपलेसे करून घेतले. मराठी भाषेमध्ये परिकथा सादर करावी हा विचार मनात आला आणि त्या शक्यता असलेले 'मानापमान' हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित नाटक वाचनात आले. 'संगीत मानापमान' हा चित्रपट 'मानापमान' या नाटकावरून प्रेरणा घेऊन बनवलेला चित्रपट आहे. गेली पाच वर्षे मानापमान चा संपूर्ण संघ मनापासून मेहेनत घेत होता. जिओ स्टुडिओज, ज्योती देशपांडे आणि सुनील फडतरे यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य नव्हत. आता आम्ही 'सीमोल्लंघन' करायला सज्ज आहोत” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
संबंधित बातम्या