Sukh Mhanje Nakki Kay Asta: छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे नाव देखील अग्रक्रमी आहे. एका श्रीमंत घरात काम करण्यापासून सुरू झालेला गौरीचा प्रवास त्याच घराची मालकीण बनण्यापर्यंत कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत नव्या कथानकासोबत अनेक नवी पात्रही भेटीला आली आहेत. मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पहायचे होते त्या शालिनी शिर्के-पाटीलची लवकरच मालिकेत एण्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेत रंजक वळण आले आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत जयदीप-गौरीसोबत शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास २५ वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परत येणार आहे. इतक्या वर्षांच्या काळात शालिनी कुठे होती? काय करत होती? याची उत्तरे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडतीलच मात्र शालिनीच्या पुन्हा येण्याने मालिकेत नवे नाट्य घडणार हे मात्र नक्की.
वाचा: यंदाची मकर संक्रांत माधुरी दीक्षितसोबत साजरी करायची? जाणून घ्या कशी
शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा येतेय. २५ वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या रहाणीमानात बरेच बदल झाले आहेत. इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं आहे. मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज पहायला मिळेल. एकाच पात्रामध्ये दोन वेगळे लूक मला साकारायला मिळत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत परत कधी येणार याची विचारणा होत होती. मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की शालिनी पुन्हा येतेय अश्या शब्दात माधवीने आपली भावना व्यक्त केली.