Suhani Bhatnagar Death: बॉलिवूड चित्रपट ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरने वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात तिच्यावर डर्माटोमायोसिटीस (Dermatomyositis) या आजाराशी संबंधित उपचार सुरू होते. सुहानीच्या डाव्या हाताला सूज आल्यानंतर या आजाराचे निदान झाले होते. सुहानीच्या निधनानंतर तिची आई पूजा यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आमिर खानचा उल्लेख केला आहे.
सुहानी आणि आमिर खान हे कायमच एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पूजा भटनागर यांनी सांगितले. “आमिर सर नेहमी तिच्या संपर्कात होते. ते खूप चांगले आहेत. सुहानीच्या आजारपणाबद्दल आम्ही त्यांना सांगितले नव्हते. कारण आधीच आम्ही त्यामुळे चिंतेत होतो. आम्ही त्याविषयी कोणालाच माहिती दिली नव्हती. आम्ही जर त्यांना एक मेसेज जरी पाठवला असता तरी लगेच ते मदतीला धावून आले असते. सुहानीला ओळखत असल्यापासून त्यांची चांगली मैत्री झाली होती. आम्हाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रणसुद्धा मिळाले होते. इतकच नव्हे तर स्वत: आमिर सरांनी फोन करून लग्नाला बोलावले होते.”
वाचा: ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन; १९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुढे त्या म्हणाल्या, “या इंडस्ट्रीमध्ये आम्ही जी काही ओळख आहे, ती सुहानीमुळेच आहे. ती खूप हुशार होती आणि प्रत्येक काम उत्तम करण्याची जिद्द तिच्यात होती. मात्र हाताला सूज आल्यानंतर तिची सर्व स्वप्ने अधुरी राहिली. सुरुवातीला हा फक्त त्वचेचा आजार आहे असे आम्हाला वाटले होते. आम्ही तिला काही डर्मटोलॉजिस्टकडेही घेऊन गेलो होतो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल केल्यानंतर तिला डर्माटोमायोसिटीस असल्याचे निदान झाले होते. मात्र उपचारादरम्यान तिला संसर्ग झाला आणि शरीरात पाणी भरले.”
दंगल' चित्रपटाचा संदर्भ देताना सुहानीच्या आईने म्हटले की, या चित्रपटासाठी तब्बल २५००० मुलांमधून त्यांच्या मुलीची निवड करण्यात आली होती. सुहानी लहानपणापासूनच कॅमेरा फ्रेंडली होती. तिला अभिनयाची आवड होती. मात्र, तिच्या सगळ्या इच्छा आणि स्वप्न अपूर्ण राहिली.
सुहानी भटनागरने १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सुपरस्टार आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसनेही एका पोस्टद्वारे सुहानीला श्रद्धांजली वाहिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सुहानी भटनागर हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. या उपचारादरम्यान सुहानी काही औषधे घेत होती. मात्र, औषधाच्या दुष्परिणामांमुळे सुहानी भटनागरच्या शरीरात हळूहळू पाणी साठू लागले. यामुळे तिची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यानच तिने अखेरचा श्वास घेतला. शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी सुहानी भटनागर हिने जगाचा निरोप घेतला.