मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Phulrani: कोण असणार सुबोध भावे यांची ‘फुलराणी’? चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!

Phulrani: कोण असणार सुबोध भावे यांची ‘फुलराणी’? चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 03, 2023 01:50 PM IST

Phulrani First Poster Out : हातात फोन अन् फॅशनचा जलवा दाखवणारी ही ‘फुलराणी’ नक्की कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

Phulrani First Poster Out
Phulrani First Poster Out

Phulrani First Poster Out : मराठी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता सुबोध भावे लवकरच एका चित्रपटात रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा फार पूर्वीच करण्यात आली असली, तरी त्याविषयी कोणतीही अपडेट देण्यात आली नव्हती. मात्र, आज (३ जानेवारी) या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. या चित्रपटात सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, आता ‘फुलराणी’ कोण असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

अभिनेता सुबोध भावेने या आधी देखील ‘फुलराणी’ चित्रपटाची झलक चाहत्यांना दाखवली होती. मात्र, तेव्हाही यात अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. आता या चित्रपटाचं नवं पोस्टर समोर आलं आहे, ज्यात ‘फुलराणी’ साकारणारी अभिनेत्री पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. निळ्या डेनिमच्या आकर्षक रंगसंगती केलेल्या कपडयातील फुलांनी मढलेली, आत्मविश्वासाने मोबाईलवर बोलणारी, पाठमोरी ‘फुलराणी’ या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. हातात फोन अन् फॅशनचा जलवा दाखवणारी ही ‘फुलराणी’ नक्की कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.

सुबोध भावेंची ‘फुलराणी’ नेमकी कोण असणार, या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच २२ मार्चला ही ‘फुलराणी’ मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. या चित्रपटातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे.

जगप्रसिद्ध ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट साकारत आहे. ‘फिनक्राफ्ट मिडिया’ आणि ‘अमृता फिल्म्स’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून जाई जोशी, विश्वास जोशी, श्री.ए.राव या चित्रपटाचे निर्माते आहेत. या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. छायांकन केदार गायकवाड, तर कलादिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.

IPL_Entry_Point