Subodh Bhave On AI technology: मराठी मनोरंजन विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. एकीकडे चित्रपटामध्ये तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या वापर होत असताना, आता मालिकांमध्ये देखील अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून पाहण्याचा अभिनव प्रयोग सुरू झाला आहे. लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे यांची ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका नुकतीच छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. या मालिकेत सुबोध भावे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञानाचाचा वापर करून कॉलेजवयीन तरुणाची भूमिका साकारली आहे. या नव्या मालिकेत सुबोध भावे यांची दुहेरी भूमिका दिसत आहे. एका भूमिकेत ते कॉलेजमधले कडक प्राध्यापक दाखवले आहेत. तर, दुसऱ्या एका भूमिकेत त्याच कॉलेजमध्ये प्रेम गाजवणारा २५ वर्षांचा तरुण देखील त्यांनी साकारला आहे.
तरुण वयातील सुबोध भावे साकारण्यासाठी त्यांनी एआय या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज होताच एआय तंत्रज्ञान वापरल्यामुळे मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर टीका करण्यात आली होती. अनेकांनी एआय तंत्रज्ञानाचा वापरामुळे कलाकारांच्या पोटावर पाय येत असल्याचा सूर आळवला होता. एआय वापरून एखाद्या कलाकाराने आपल्या तरुणपणाची भूमिका साकारल्यामुळे नवख्या कलाकाराच्या हातची संधी गेली, असा सूरही अनेकांनी लावला होता. यावर सुबोध भावे यांनी आता थेट प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच सुबोध भावे यांनी एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या मालिकेत एआय तंत्रज्ञान वापरण्यावर भाष्य केले आहे. याबद्दल बोलताना सुबोध भावे असे म्हणाले की, ‘एआयच्या वापरामुळे कुणाच्याही पोटावर पाय आलेला नाही. आता त्या मालिकेतील तरुण वयाची भूमिका मीच साकारायचं ठरवल्यावर दुसऱ्या कोणाचा विचार कसा काय करणार होतो? आणि जर यामुळे एखाद्या नवीन कलाकाराच्या पोटावर पाय येतोय असं म्हणायचं असेल, तर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. त्यापैकी मी एकाच मालिकेत काम करत आहे. मग, इतर उरलेल्या मालिकेतील कलाकारांच्या पोटावर मी पाय दिलेला नाही ना? मी स्वतः देखील एक अभिनेता आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी अभिनय करत राहणार.’
‘तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोटावर पाय वगैरे हा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरचा शहाणपणा मला कुणी शिकवू नका. मी देखील अनेक गोष्टी सोडून, त्याग करून इथे कलाकार म्हणून काम करत आहे. माझ्याकडे इतर हजार व्यवसाय नाहीत. मी केवळ अभिनयावरच जगणारा माणूस आहे. त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करतच राहणार. माझ्या एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन कलाकारांच्या पोटावर पाय येतोय हा शहाणपणा मला तरी शिकवू नका. मी इथे अभिनय करायला आलो आहे आणि जिवंत असेपर्यंत अभिनय करणार’, अशा कडक शब्दांत सुबोध भावे यांनी टीका करणाऱ्यांना साडेतोर उत्तर दिलं आहे.
संबंधित बातम्या