मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध एकत्र करणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला होता. त्यांचा 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाच्या टीझरमध्ये घरच्यांच्या सांगण्यानुसार दोन मध्यमवयीन 'तरुण तरुणी' लग्नासाठी 'पाहाण्याच्या कार्यक्रमा'निमित्ताने भेटत आहेत. यावेळी ते एकमेकांच्या वयाचा अंदाज बांधताना दिसत आहेत. टीझरमधील संवाद मजेशीर असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री या टीझरमध्ये खुलून दिसत आहे. त्यामुळे आता थोडीशी लेट पण एकदम थेट सुरू झालेली ही सफर पाहायला मजा येणार आहे.
'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून, निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जबरदस्त टीझरमधून लग्न या विषयावर आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टीकोन पाहायला मिळत आहे.
'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटात लग्नकार्यातील धमाल पाहायला मिळणार आहे. याशिवाय आजच्या काळातील लग्न, सध्याच्या तरुण पिढीचे विचारही दिसणार आहेत. तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही. पण हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
वाचा : फाटलेले कपडे घालून कंटाळलो होतो; विक्रांत मेसीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, "आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आत्ताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटेल, असा आहे. त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपणा बघण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.”