गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. खरं तर लोकांचा उत्साह पाहून निर्मात्यांनी एक दिवस आधी 'स्त्री २' चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि १४ ऑगस्टला काही ठिकाणी नाईट शो ठेवले. आता नाईट शो पाहणारे लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्पॉयलर्स देत आहेत आणि त्यांना हा चित्रपट कसा आवडला हे सांगत आहेत. चला तर मग जाणून घेऊया सोशल मीडियावर लोक काय म्हणतात चित्रपटाविषयी...
'स्त्री २' चित्रपटामध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत असल्याची माहिती प्रेक्षकांनी दिली आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अक्षय कुमारच्या लूकचा एक फोटोही लीक झाला आहे. एका युजरने अक्षयचा फोटो शेअर करत, 'अक्षयचा कॅमिओ जबरदस्त आहे' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने "एक मिनिटासाठी आला आणि भाव खाऊन गेला" असे म्हणत अक्षयचे कौतुक केले आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'अक्षय कुमार हॉरर कॉमेडीमध्ये परतला आहे. आता मजा येईल' असे म्हटले आहे.
अक्षय कुमारच्या कॅमिओसोबतच सोशल मीडियावर प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, 'काय सिनेमा बनवला आहे भाऊ. मजा आली. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांनी उत्तम काम केले आहे. सर्व कॅमियोही जबरदस्त आहेत.' दुसऱ्या एका यूजरने 'श्रद्धा कपूरची एण्ट्री जबरदस्त आहे' असे म्हटले. तिसऱ्या एका यूजरने लिहिलं, 'कॉमेडी मस्त आहे. थिएटरमध्ये सगळे हसत होते. पंचलाईन्सही अप्रतिम आहेत.'
गेल्या काही दिवसांपासून ‘स्त्री २’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट म्हणजे आज सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पण प्रेक्षकांची उत्सुकता पाहाता निर्मात्यांनी काही ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे आता हा दुसरा भाग किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच या भागात अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.