Stree 2 Collection Day 4: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'स्त्री २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाचा पहिला भाग अशा वळणावर संपला की, चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग खूप जोरदार होते आणि जेव्हा निकाल समोर आले, तेव्हा असे दिसून आले की चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन अंदाजित आकड्यापेक्षा बरेच वर गेले आहे.
भारतीय बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले, तर शनिवारपर्यंत चित्रपटाचे कलेक्शन १३५ कोटी ५५ लाख रुपयांवर गेले आहे. पेड प्रिव्ह्यूच्या दिवशी या चित्रपटाने ८ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. पण, शुक्रवारी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याचे ओपनिंग डे कलेक्शन ५१.८० कोटी रुपयांवर गेले होते. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात किंचित घट झाली असली, तरी त्याचे एकूण कलेक्शन ३१.४ कोटी रुपये होते. तिसऱ्या दिवशी या व्यवसायात सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आणि चित्रपटाची ४३.८५ कोटी रुपयांची कमाई झाली.
शनिवारपर्यंत चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १३५ कोटी ५५ लाख रुपये झाले आहे. पण, आता प्रश्न असा आहे की, जेव्हा चित्रपटाचा पहिला रविवार येणार आहे, तेव्हा या दिवशी त्याचे एकूण कलेक्शन किती असेल? चित्रपटांच्या कमाईचे आकडे जाहीर करणाऱ्या प्लॅटफॉर्म सॅकनिल्कने एका अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत ११.३८ कोटी रुपयांची तिकिटे बुक झाली आहेत, पण हा आलेख आणखी वाढेल. म्हणजेच रविवारी चित्रपटाची कमाई जवळपास ४५ कोटी रुपये होऊ शकते.
पण, श्रद्धा कपूरचा हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित करेल का? हे येणारा काळच सांगेल. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री चित्रपटाचा पहिला भाग २०१८मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर बराच काळ लोटला आणि प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. पण, हा चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षेवर खरा उतरवण्यात यशस्वी ठरल्याचे बिझनेस स्पष्टपणे सांगत आहे.