पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वप्नील म्हणतोय, तुम्ही विश्वासच्या प्रेमात पडाल!

स्वप्नील जोशी

मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेमधून छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. या आधी २०१२ मध्ये 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या गाजलेल्या मालिकेमध्ये स्वप्नीलने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर छोट्या पडद्यावर त्याने कोणतीही प्रमुख भूमिका साकारली नव्हती. पण आता 'स्टार प्रवाह' वाहिनीचा 'प्रोग्रॅमिंग हेड' आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडेच्याच मालिकेच्या माध्यमातून स्वप्नील जोशी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे.

या नव्या मालिकेबद्दल स्वप्नील म्हणाला, मुंबई पुणे मुंबई ३ या सिनेमावेळीच सतीशने मला एक स्टोरी सांगितली होती. नातेसंबंध आणि प्रेम यावर ती स्टोरी आधारलेली होती. पण दोन तासांच्या सिनेमामध्ये या स्टोरीला कसा न्याय द्यायचा असा प्रश्न त्यावेळी स्वप्नीलने विचारला. त्यानंतर हा विषय मागे पडला. काही दिवसांपूर्वीच सतीशने मला पुन्हा एकदा बोलावून घेतले आणि त्या स्टोरीवर आपण मालिकेची निर्मिती करीत असल्याचे सांगितले. ही स्टोरी जेव्हा ऐकली होती, त्यावेळीच मी त्यामध्ये काम करायचे निश्चित झाले होते. त्यामुळे सतीशने मला सांगितल्यावर दुसरा कोणताही विचार करण्याचे माझ्या मनातही आले नाही. मी लगेचच त्याला होकार दिला.

नव्या मालिकेमध्ये स्वप्नील साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे नाव विश्वास आहे. एखादा सर्वसामान्य नवरा जसा असेल, तसाच हा विश्वास आहे, असे स्वप्नीलने सांगितले. या मालिकेचा विषय एकदम हटके आणि नवा आहे. सध्याच्या काळात नातेसंबंधांचा संदर्भ काय आहे, यावर या मालिकेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. समकालीन विषयांवर ही मालिका बोलते त्यामुळेच ती काळजाला भिडू शकते, असे स्वप्नीलने सांगितले.

पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत असल्याबद्दल सांगताना स्वप्नील म्हणाला, टीव्हीमुळेच मी अभिनयाच्या क्षेत्रात आलो. मी सध्या जो काही आहे तो टीव्हीमुळेच. पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर काम करण्याची संधी मिळते आहे, याबद्दल निश्चितच आनंद आहे. खरंतर टीव्ही आता छोटा पडदा राहिलेला नाही, असेही स्वप्नीलने स्पष्ट केले.