पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपण जसे आहोत, तसेच सुंदर आहोत; विद्या बालनचा मंत्र

विद्या बालन

आपण जसे आहोत, तसेच आपण आपल्याला स्वीकारणे. समोरचा काय म्हणतोय, यावर आपलाच आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन न बदलणे, हे विचार जर कोणी बॉलिवूडमध्ये सध्याच्या काळात मांडण्याचा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ती म्हणजे अभिनेत्री विद्या बालन. सध्याच्या काळात जिथे तुम्ही मनाने किती छान आहात, यापेक्षा बाह्य शरीराने कसे दिसता, यावरच सगळे जोखले जात असताना, विद्या बालनचे विचार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. पण या विचारांपर्यंत येण्यासाठी विद्या बालनलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तिने स्वतः तिच्या शब्दांमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत माझ्या सुडौल देहयष्टीवरून अनेकजण माझ्यावर टीका करीत होते. काहीवेळा या टीकेमुळे माझा माझ्यावरचा विश्वासच उडाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. पण मी त्यातूनही तरून पुढे आले. विद्या बालन म्हणते, एक काळ असा होता की माझे माझ्या शरीराशीच द्वंद्व सुरू होते. मला माझ्याच शरीराचा खूप राग यायचा. माझे शरीर बदलले पाहिजे, असे मला वाटायचे. शरीर बदलले, तरच माझ्याबद्दल लोकांना प्रेम वाटेल, असे मला वाटायचे. पण नंतर मी वजन कमी केल्यावर माझ्या असे लक्षात आले की, आजही मी अनेकांना स्वीकारार्ह वाटतच नाही. त्यामुळे इतरांसाठी स्वतःमध्ये बदल करण्यात काहीच हाशील नाही. आपण जसे आहोत, तसाच आपला स्वीकार करणे जास्त संयुक्तिक ठरते.

खूप टीका आणि अवहेलना सहन केल्यानंतर मी माझ्याकडेच नव्याने बघायला सुरुवात केली, असे सांगून विद्या बालन म्हणते, मी माझ्या शरीराचा आहे तसा स्वीकार करायला आणि त्याच्याबद्दल आदर बाळगायला शिकले. आपण सुंदर आहोत आणि त्यामुळे आनंदी आहोत, असे मी स्वतःच्या मनाला सांगायला सुरुवात केली. समोरचा काय म्हणतो, म्हणून मी माझ्या शरीराकडे तुच्छतेने बघणार नाही, याचा मी स्वीकार केला. मला असे वाटते की माझ्या शरीराला दिलेली हीच माझी सर्वात मोठी भेट होती. 

अलीकडे कुठेही गेले की लोक एकमेकांशी शरीराच्या ठेवणीवरूनच बोलताना दिसतात. तू वजन किती कमी केले, काय डाएट घेतेस, कोणता व्यायाम करतेस, असेच प्रश्न विचारले जातात. पण मला याबद्दल बोलण्यात अजिबात रस नसतो, असेही विद्या बालनने सांगितले. आपले शरीर सहजपणे इतरांना दिसते म्हणून लोक त्याबद्दल बोलतात, याकडेही तिने लक्ष वेधले.