अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. ट्विंकल अगदी बिंधास्तपणे आपलं मत सोशल मीडियावर मांडते. तिचे स्पष्ट विचार अनेकांना आवडतात तर काहींना ते खटकतात. काही दिवसांपूर्वी अक्षयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी ट्विंकलविषयी आपलं मत मांडलं होतं. ट्विंकल घरातला सर्व राग माझ्यावर काढते मी तिचे ट्विट्स नेहमीच वाचतो असं पंतप्रधान म्हणाले होते. यानंतर पंतप्रधानांनी आपली दखल घेतल्याचा आनंदही तिनं व्यक्त केला होता. या मुलाखतीनंतर अनेकांनी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना भाजपाचा प्रचार करत असल्याची टीका देखील केली.
या टिकेवर ट्विंकलनं उपहासात्मक उत्तर दिलं आहे. “कोणाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणं याचा अर्थ मी एखाद्या पक्षाचा प्रचार करतेय असा होत नाही. जो पक्ष ‘व्होडका’ची पार्टी देईन आणि त्यामुळे मी दुसऱ्या दिवसापर्यंत ‘हँगओव्हर’मध्ये राहीन अशाच पक्षात मला जायला आवडेल असं मिश्किल ट्विट तिनं केलं आहे. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Nothing more-Nothing less - A response does not translate into an endorsement. The only party I am likely to be a part of at this point would involve liberal amounts of vodka shots and a hangover the next day :) #PartyingShot pic.twitter.com/Y14Ovvjymh
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) April 26, 2019
अक्षयने मुलाखतीत मोदींना सोशल मीडियाबद्दल प्रश्न विचारला होता तेव्हा मोदींनी गंमतीशीर पद्धतीने उत्तर दिले होते. ‘मी ट्विंकल खन्ना यांचेसुद्धा ट्विट्स वाचतो. कधी कधी मला वाटतं की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे,’ असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं होतं.
या मुलाखतीनंतर मोदींनी चक्क आपली दखल घेतली हे पाहून ट्विंकलनं आपला आनंद व्यक्त केला होता.