पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

The Neighbors Window : शेजाऱ्यांच्या घरात डोकावून पाहताना बदलेलं आयुष्य

द नेबर्स विंडो

आठवड्याभरापूर्वी ऑस्कर सोहळा पार पडला. या सोहळ्यात 'द नेबर्स विंडो' या २० मिनिटांच्या लघुपटानं Best Live-Action Short film  या विभागात पुरस्कार जिंकला. वेगवेगळ्या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावलेले अनेक चित्रपट आहेत. मग 'द नेबर्स विंडो' हा चित्रपट का बरं  सगळ्यांपेक्षा खास ठरला असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण मला खात्री आहे चित्रपट संपल्यानंतर २१ व्या मिनिटांला तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळालं असेल.

शेजाऱ्यांच्या घरात नेमकं काय चालू आहे हे जाणून घ्यायचं कुतूहल मनुष्याला असतं. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच कधीना कधी शेजाऱ्यांच्या घरात त्यांच्या नकळत डोकावून पाहिलं असेलच. आता तुम्ही मान्य करा किंवा नाही पण हे करत असताना आपण अनेकदा मनातल्या मनात  शेजाऱ्यांच्या आयुष्याची आपल्या आयुष्याशी तुलना नक्कीच केलेली असते. विशेष म्हणजे आपल्या कुटूंबापेक्षा शेजारी राहणारं कुटूंब अधिक आनंदी दिसू लागलं की आपल्या मनानं केलेली तुलना मनुष्य स्वभावास आतून पोखरु लागते. आपल्या आयुष्यात काहीतरी चुकतंय या विचाराची वाळवी नात्याचे वासे पोखरू लागते, नेमक्या याच विषयाची आतापर्यंत बंद असलेली खिडकी उघडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे.

कुटुंबीयांच्या विरोधामुळे मधुबाला यांचा बायोपिक रखडला, बहिणीची कबुली

ही कथा आहे शहरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची. या जोडप्याला तीन लहान मुलं आहेत. अ‍ॅली  (Maria Dizzia) या कथेची मुख्य नायिका आहे जी मध्यमवयीन स्त्री आहे अन् घराच्या जबाबदारीमुळे त्रस्त आहे. तिचं आयुष्य लहान मुल आणि घरच्या जबाबदारीत अडकलं आहे. आपल्याकडे कोणत्याही घरात डोकावून पाहिलं तर दिसणाऱ्या प्रत्येक तिशीतल्या स्त्रीसारखीच ती सामान्य आहे. आपल्या इथल्या स्त्रियांना असतील इतक्याच तंतोतंत तक्रारी अ‍ॅलीच्याही आहेत.

तीन मुलं पदरात आहेत. नवरा काहीसा बेफिकीर आहे. त्याच्याकडे विशेष अशी जबाबदारी नाही म्हणूनच घरात काहीसा काणाडोळा करून वावरणारा तो आहे. आपल्या संसारात पूर्वीसारखी मज्जा नाही ना नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष आहे या विचारानं ती बैचेन आहे. आयुष्यातून रोमान्स नावाची मज्जा कधीच निघून गेलीय या भावनानं तिची होणारी चिडचिड, येणारं नैराश्य यात ती पुरती बुडाली आहे. अशातच एक दिवस तिच्या आयुष्यात एक चमत्कारिक घटना घडते.

डोनाल्ड ट्रम्प दौरा : यमुनेच्या पाण्यातील दुर्गंधी घालवण्यासाठी निर्णय

तिच्या घराच्या अगदी समोरच्या इमारतीत एक तरुण जोडपं राहत असतं. अ‍ॅलीच्या घरातील खिडकीतून समोरच्या तरुण जोडप्याच्या घरातील एकूण एक गोष्ट नजरेस पडतात हे तिच्या लक्षात येतं. एकेरात्री प्रेमात आकंठ बुडालेलं ते जोडपं तिच्या नजरेस पडतं. ती आणि तिचा नवरा उत्सुकतेपोटी  खिडकीपलीकडून दिसणाऱ्या त्यांच्या प्रणयक्रिडांकडे पाहत बसतात. सुरुवातीला अ‍ॅली कचरते मात्र तो अवघडलेपणा ती बाजूला ठेवते.  कोणी बघेल याची तमा न बाळगता इतक्या बिनधास्तपणे हे जोडपं कसं वावरू शकतं? असा प्रश्न तिला पडतो. पण दुसऱ्याच क्षणी आपल्या वैवाहिक जीवनातला 'तो' आनंद निघून गेलाय याची जाणीव तिला होते.

आपण त्यांना पाहतोय हे जोडप्याच्या लक्षात येऊ नये म्हणून अ‍ॅलीचा नवरा तिला घरातले दिवे मालवण्याचा सल्ला देतो पण दिवे मालवण्यासाठी आपण चुकीचं काय वागतोय? असा उलटप्रश्न ती नवऱ्याला विचारते. त्याचवेळी शेजाऱ्यांच्या घरात डोकावून पाहणं हे चूकच आहे याची जाणीव झाल्यावर ती दिवे मालवते.पुढचे काही दिवस समोर राहणाऱ्या त्या तरुण जोडप्यांच्या घरात खिडकीतून डोकावून पाहण्याचा सपाटाच ती लावते. रात्री अपरात्री तरुण जोडप्याच्या घरात काय सुरु आहे हे  पाहण्याचं अक्षरश: वेडच तिला लागतं.

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

समोर राहणाऱ्या जोडप्याचा संसार सुखाचा सुरु आहे, ते आयुष्य मनमुराद जगताहेत, त्यांच्या घरात सेलिब्रेशन सुरु आहे, ते एकमेकांवर मर्यादेपलीकडे प्रेम करतात या सर्व गोष्टीनं अ‍ॅली अस्वस्थ होते. पुढचे काही दिवस हाच दिनक्रम सुरु असताना कथा अनपेक्षित वळण घेते.
अ‍ॅलीच्या समोर राहणाऱ्या त्या जोडप्याच्या घरात दुःखद प्रसंग कोसळतो. तरुणाचा मृत्यू होतो, तरुणीला दु:ख अनावर होतं. ते सारं आपल्या घराच्या खिडकीतून पाहणारी अ‍ॅली पुन्हा बैचेन होते. रस्ता ओलांडून तरुण जोडप्याच्या इमारती खाली उभी राहते, शेवटी न राहवून त्या तरुणीच्या सांत्वनासाठी अ‍ॅली धैर्य एकवटून पुढे जाते. दु:खातून काहीसं सावरल्यानंतर अचानक त्या तरुणीच्या लक्षात येतं की अ‍ॅली ही अज्ञात व्यक्ती नसून त्यांच्या समोरच्या इमारतीत राहणारी महिला आहे. तरुणीनं ओळखल्यावर मात्र अ‍ॅलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो.

आपण या जोडप्याला सेक्स करताना, पार्टी करताना, हसता रडताना, नाचताना गाताना नेहमी लपून छपून पाहिलं आहे हे तिला कळलं तर नसेल ना? या विचारानं अ‍ॅली गर्भगळीत होते. मात्र ती तरुणी त्याक्षणी अ‍ॅलीला जे काही सांगते ते ऐकून अ‍ॅलीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ३६० अंशात बदलतो.

'फत्तेशिकस्त'ला 'मराठा लाइट इन्फंट्री'मध्ये मानाचे स्थान

आपण नेहमीच दुसऱ्याच्या घरात डोकावताना मनात सतत तुलना करतो, त्यांच्याकडे बरंच काही आहे आणि आपल्याकडे काहीच नाही या नकारात्मक विचारानं स्वत:ला कमी लेखू लागतो, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर मनुष्याच्या हा स्वभाव सगळीकडे सारखा असतो, म्हणूनच 'द नेबर्स विंडो' प्रत्येकाला तितकाच रिलेट करतो.चारवेळा ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या दिग्दर्शक लेखक मार्शल करीनं या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे तितकाच साधा पण नवा दृष्टीकोन देणारा हा लघुपट एकदा पाहायला हरकत नाही.

प्रतीक्षा चौकेकर 

pratiksha.choukekar@htdigital.in