पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MeToo प्रकरणात नाना पाटेकरानां क्लीन चिट नाहीच, तनुश्रीचं स्पष्टीकरण

तनुश्री दत्ता नाना पाटेकर


गेल्या वर्षी MeTooच्या आरोपांखाली वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाना पाटेकर यांना  पोलिसांनी क्लीन चिट दिलेली नाही, मात्र नानांच्या  पीआर टीमकडून त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी खोट्या अफवा  पसरवल्या जात असल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं एएनआय वृत्तसंस्थेशी  बोलताना केला आहे. 

 मीटुच्या आरोपांमुळे नानांची प्रतिमा आता  मलिन झालीये, त्यांना  या क्षेत्रात काम मिळेनासं झालंय म्हणूनच त्यांची  प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांच्या पीआर टीमकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप तनुश्रीनं केला आहे. नाना पाटेकर यांना  क्लीन चिट मिळालेली नाही या प्रकरणात अजूनही चौकशी  सुरू आहे  त्यामुळे लैंगिक गैरवर्तणुकीच्या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली असल्याच्या बातम्या  माध्यमात पसरवण्यात आल्या आहेत, त्या पूर्णपणे खोट्या असल्याचं तनुश्रीनं  म्हटलं आहे. 

ऑक्टोबर २०१८ मध्ये तनुश्रीनं 'हॉर्न ओके प्लीज'च्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तणूक केली असा आरोप  केला  होता. या आरोपांमुळे नाना पाटेकर मोठ्या वादात सापडले होते. तसेच तिनं  एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी राजकीय पक्षांच्या गुंडांकरवी  धमकावल्याचा आरोपही केला होता. तिनं  गेल्यावर्षी नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रारही  दाखल केली होती. या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. 

मीटु आरोपांखाली वादात सापडलेल्या  नाना पाटेकर  यांना पोलिसांनी क्लीन चीट दिल्याच्या बातम्या  खोट्या असल्याचं  तिनं म्हटलं आहे.  या प्रकरणातील साक्षीदारांना नानांची माणसं धमकी देत आहेत तसेच खोटे साक्षीदारही दिशाभुल करण्यासाठी समोर आणले जात  असल्याचा दावा तिनं  एएनआयला  दिलेल्या मुलाखतीत केला आहे.  मला गेल्या १० वर्षांत या  प्रकरणामुळे खूप मानसिक त्रास झाला. मी याच त्रासाला कंटाळून चित्रपटसृष्टी सोडून दूर निघून गेले. आता मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असंही ती म्हणाली.

तनुश्रीनं दत्तानं केलेले आरोप नाना पाटेकर यांच्या वकिलांनी फेटाळून  लावले आहेत.  नाना पाटेकर यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहे त्यात कोणतंही तथ्य नाही असं नानाचे वकील अनिकेत निकम म्हणाले.