पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जयंती विशेष: बंडखोर, बेधडक आणि सशक्त अभिनेत्री

दिवंगत अभिनेत्री लालन सारंग (छायाचित्र-फेसबुक)

नाटकांच्या माध्यमातून साकारलेल्या भुमिकांमधून केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर भर देणाऱ्या बंडखोर, बेधडक, सशक्त अभिनेत्री म्हणजेच, "लालन सारंग" 

२६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात त्यांचा जन्म झाला. त्या माहेरच्या "पैंगणकर". एक भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असे त्यांचे मध्यमवर्गीय कुटुंब होते. गिरगावातील ‘राममोहन’ शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी पदवी प्राप्त केली.

जयंती विशेष : रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारा 'कालिया', 'रॉबर्ट' अन् 'बळी'

शिक्षण घेत असतानाच दुसरीकडे त्या खासगी कंपनीत नोकरी देखील करत होत्या. काही काळ मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयातही त्यांनी नोकरी केली. ‘आयएनटी’च्या स्पर्धेत महाविद्यालयाने सादर केलेल्या एका नाटकात त्यांनी काम केले आणि तिथूनच त्या नाट्यक्षेत्राकडे वळल्या. मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार' आदी गाजलेल्या नाटकांचा यात समावेश होता. त्यानंतर आपल्या बहारदार अभिनयाने जवळ जवळ ५ दशकांचा काळ गाजवत रंगभूमीवर आपला आगळा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. 

Happy Birthday: जन्मजात प्रचंड एनर्जीची दैवी देणगी लाभलेला कलाकार

'कमला', 'गिधाडे', 'सखाराम बाइंडर', 'रथचक्र' यांसारख्या नाट्य परंपरांना छेद देणाऱ्या नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’, 'लग्न' 'आक्रोश' 'आरोप' 'उद्याचा संसार' 'उंबरठ्यावर माप ठेविले' 'कालचक्र', 'खोल खोल पाणी', 'घरकुल', 'चमकला ध्रुवाचा तारा', 'जंगली कबुतर', 'जोडीदार', 'तो मी नव्हेच', 'धंदेवाईक', 'पोलीसनामा', 'बिबी करी सलाम', 'बेबी', 'मी मंत्री झालो', 'राणीचा बाग', 'लग्नाची बेडी', 'संभूसांच्या चाळीत', 'सहज जिंकी मना', 'सूर्यास्त', 'स्टील फ्रेम' (हिंदी), स्वयम् आदी नाटकात आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. या सर्व नाटयप्रवासात त्या केवळ कलावंत म्हणून नाही, तर पती कमलाकर सारंग यांच्यासह सहनिर्माती म्हणूनही सक्रिय होत्या.

स्मृतिदिन विशेष : ..अचानक नियतीचे फासे उलटे पडले

सामना, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटांत तसेच अनेक हिंदी मराठी मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने छोटा पडदा गाजवला. ‘नाटकांमागील नाटय़’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’ आदि पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली. कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. 

त्यांना ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा, विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्कार, पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं. दुर्दैवाने ९ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांच्या दैदीप्यमान कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. पण तरीही आपल्या अनुभव-समृद्ध कारकीर्दीत त्यांनी साकारलेल्या बहुविध जबरदस्त भूमिकांमुळे त्या रसिकांच्या हृदयात अजूनही अजरामर आहेत. अशा या अफलातून अभिनेत्रीला मानाचा मुजरा...

स्मृतिदिन विशेष : 'आनंदयात्री सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला'

#नाट्यकर्मीविजू