पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Bharat movie review : विविधतेनं नटलेला सलमानचा 'भारत'

भारत

चित्रपट : भारत
दिग्दर्शक : अली अब्बास जफार
स्टार कास्ट : सलमान,  दिशा, कतरिना, सुनील, तब्बू, जॅकी शॉफ, सोनाली 
रेटिंग : ३/५ 
 

भारत म्हणजे विविध संस्कृतीनं नटलेला देश. इथे पावलोपावली  बदलत जाणारं निसर्गाचं सुंदर रुप आहे. इथे प्रेम आहे आणि जीव लावणारी माणसंही आहेत, इथे भांडणंही आहे अन् वादही आहेत. याच वैविध्य़ात एकताही आहे. जसा भारत वैविध्यानं नटला आहे तसाच काहीसा सलमानचा चित्रपट 'भारत'ही  याच वैविध्यानं नटला आहे. प्रेम, सुख:- दु:ख, विरह, राग- लोभ, साहस या विविध गोष्टीनं तो साकारला आहे. 

दरवर्षी ईद म्हटलं की सलमानचा चित्रपट हा ओघानं आलाच. ईदच्या दिवशी नवीन चित्रपट प्रदर्शित करून सलमान आपल्या चाहत्यांना ईदी देतो. तर यावर्षी  सलमाननं वेगळी ईदी त्याच्या चाहत्यांना दिली.  'ट्युबलाइट', 'रेस ३' सारखे चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर सलमानच्या पुढ्यात मोठं आव्हान होतं मात्र हे आव्हान त्यानं तितक्याच ताकदीनं पेललं. निव्वळ  मनोरंजनापेक्षा आजचे प्रेक्षक हे हृदयाला भीडणाऱ्या आशयाच्या शोधात असतात ही  नस सलमाननं अचूक पकडली. 

या चित्रपटाची सुरूवात होते ती भारत पाकिस्तान फाळणी पूर्वी झालेल्या दंग्यानं. या  फाळणीमुळे कित्येक लोकांनी आपले प्राण गमावले, जीवाभावाची माणसं गमावली. भारत (सलमान) या दंगलीत आपल्या वडील आणि बहिणीपासून दुरावतो. मात्र आयुष्याची पुढची ६० वर्षे तो वडिलांना दिलेलं वचन  नेटानं पाळण्यात घालवतो. हा चित्रपट पाहताना त्यातील अनेक दृश्यामुळे डोळ्यांच्या कडा पाणावतात. मात्र 'जितने सफेद बाल मेरे सर और दाढी मे हैं, उससे कही ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही है... ', असं म्हणणाऱ्या याच भारतच्या आयुष्यातील काही घटना चेहऱ्यावर हसू आणतात.

'भारत' ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नसून ती संपूर्ण देशाची गोष्ट आहे याची जाण चित्रपट पाहताना अनेक दृश्यात येते. तारुण्यात भारत सर्कशीत  काम करू लागतो यावेळी राधा (दिशा पटानी) त्याला साथ देते. मात्र राधा निघून गेल्यानंतर भारत एका तेल निर्यात कंपनीत काम करू लागतो. इथे त्याची ओळख कुमुद (कतरिना)शी होते. कुमुदवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भारतची प्रेमकहाणी कशी  वळण घेते  हे  चित्रपट पाहताना हळूहळू उलगड जातं. 

वडिलांपासून ताटाटूत झालेला भारत संपूर्ण आयुष्य कसा व्यतीत करतो याचा प्रवास या चित्रपटात आहे. या चित्रपटात भारत पाकिस्तानची फाळणी, नेहरूंचं निधन, भारतानं जिंकलेला पहिला वर्ल्ड कप,  अमिताभ बच्चन यांचा उदय यांसारख्या बऱ्याच गोष्टींचे संदर्भ या आहेत. या घटना पाहताना प्रेक्षक भारतसोबत भूतकाळात पोहोचतो. तारुण्यापासून जीवनात आलेल्या विविध अनुभवांचं गाठोडं घेऊन वृद्धापकाळापर्यंत पोहोचलेल्या भारताची ही जीवनगाथा सलमानं उत्तम रेखाटली आहे. त्यामुळे  हा प्रवास पाहण्यासाठी एकदा भारत चित्रपटगृहात जाऊन पाहण्यास हरकत नाही.  

चित्रपटातील अनेक दृश्य ही भूतकाळातील आहे. अर्थात  चित्रपट हा सबकुछ सलमान असल्यानं दिशा, कतरिना, सुनील यांच्या भूमिका काहीशा भारतपुढे गौण वाटू लागतात. दिशा, कतरिना, सुनील, तब्बू, जॅकी शॉफ, सोनाली कुलकर्णी यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका या  तुलनेनं लहान असल्या  तरी  त्या भूमिकेला  योग्य तो न्याय देण्याचा  त्यांनी केलेला प्रामाणिक  प्रयत्न  सर्वांना आवडतो. 

भारत पाकिस्तानची फाळणी होऊन काळ लोटला तरी या फाळणीच्या जखमा  तितक्याच दोन्ही देशांतील लोकांच्या मनात ताज्या आहेत या जखमेवर मायेची फुंकर घालण्याचा भाबडा प्रयत्न  सलमानच्या भारतनं केला आहे. भारतचा प्रवास  प्रेक्षकांच्या  डोळ्याच्या पापण्या ओलावणारा आहे पण तितकाच तो प्रेम करायला लावणाराही आहे हे नक्की.