पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आदरपूर्वक वागणूक दिली तरच लक्ष्मीबॉम्बचा पुन्हा विचार करेन'

लक्ष्मी बॉम्ब

दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट 'कंचना'चा रिमेक असलेल्या 'लक्ष्मी बॉम्ब' चा फर्स्ट लूक दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी माघार घेतली. मात्र आता ते कदाचित पुन्हा  एकदा या चित्रपटाच्या  दिग्दर्शनाकडे वळू शकतात.  निर्मात्यांनी मला योग्य तो आदर आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली तर मी नक्की या चित्रपटाबद्दल पुन्हा विचार करेन असं  लॉरेन्स  म्हणाले. 

चित्रपटातून माघार घेतल्यानंतर अनेक चाहते आणि हितचिंतकांनी मला चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची विनंती केली. गेला आठवडा माझ्यासाठी खूप कठीण गेला. या चित्रपटात संधी मिळावी यासाठी  मी खूप मेहनत घेतली आहे. निर्मितीपूर्व प्रक्रियांमध्येही मी सहभागी झालो. निर्माते माझी भेट घेण्यासाठी चेन्नईला येत आहेत. जर माझ्या  कामाप्रती त्यांनी योग्य आदर दाखवला, मला आदरपूर्वक  वागणूक दिली तर मी  लक्ष्मी बॉम्ब करण्याचा पुन्हा विचार करेन', असंही ते म्हणाले. 

 'लक्ष्मी बॉम्ब'चं पहिलं पोस्टर आपल्याला विश्वासात न घेता  प्रसिद्ध करण्यात आलं असा आरोप त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टद्वारे केला होता. 'ज्या घरात आपल्या मान मिळत  नाही तिथे कधीही थांबायचं नसतं असं म्हणतात. प्रश्न प्रसिद्धी किंवा पैशांचा नसून तो स्वाभिमानाचा आहे. या जगात प्रसिद्धी, पैशांपेक्षाही स्वाभिमानाला  महत्त्व आहे म्हणूनच मी  लक्ष्मी बॉम्ब न करण्याचा निर्णय घेतला आहे.  मला यामागची कारणं सांगायची नाहीत कारण ती बरीच आहेत. मात्र महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचा फर्स्ट लूक मला न सांगता  रिलीज करण्यात आला. लक्ष्मी बॉम्बच्या फर्स्ट लूकबद्दल मला  तिसऱ्या व्यक्तीकडून कळलं. माझ्याशी याबद्दल कोणतंही  बोलणं झालं नव्हतं.  आपल्या चित्रपटाबद्दल एक मोठी गोष्ट घडते आणि ती आपल्याला तिसऱ्या व्यक्तीकडून कळते यापेक्षा दुखद गोष्ट ती कोणती. ही गोष्ट अत्यंत त्रासदायक आहेत पण अपमानकारकही आहे. शिवाय या चित्रपटाच्या पोस्टरबद्दल मी समाधानी नाही. असं कोणत्याही दिग्दर्शकासोबत होता कामा नये. ' असा राग राघव यांनी आपल्या ट्विटर पोस्टमधून काहीदिवसांपूर्वी व्यक्त केला होता. 

 चित्रपटाच्या निर्मात्यांशी भेट घेतल्यानंतर या चित्रपटात परतायचं की नाही याचा ते  निर्णय घेणार आहेत. दरम्यान अक्षय आणि लॉरेन्सच्या चाहत्यांनी मात्र ते चित्रपटात परतावे अशीच इच्छा व्यक्त केली आहे.