पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रविण तरडे आणणार ‘सरसेनापती हंबीरराव’यांची शौर्यगाथा

सरसेनापती हंबीरराव मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेल्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लाखो मावळ्यांनी जिवाचं रान केलं. स्वराज्य निर्मितीच्या पवित्र कार्यात कित्येकांनी  आपल्या पराक्रमाचं बलिदान दिलं. त्यांची शौर्यगाथा स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी  कोरली  आहे. त्यातील एक म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते होय. त्यांची शौर्यगाथा प्रविण तरडे रुपेरी पडद्यावर आणणार आहेत.

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी नुकतीच ‘सरसेनापती हंबीरराव’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. 'तुटून पडला हात नाही सोडली तलवारीची साथ'  या एका वाक्यात  सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याचं केलेलं वर्णन अंगावर रोमांचं आणणारं होतं.  या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रवीण तरडे यांनीच सांभाळली  आहे.

या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 पुण्यात शिवजयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीमध्ये तरडे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली  होती. तेव्हापासून या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रवीण तरडे यांच्या  'मुळशी पॅटर्न' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.