मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या दररोज काहीना काही नवीन प्रयोग होताना पाहायला मिळत आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरून आता चित्रपट अधिक रंजक बनवण्याचा प्रयत्न निर्माते देखील करताना दिसत आहेत. मराठीतही आता ॲक्शन आणि भयपट चांगलेच गाजू लागले आहेत. रहस्यमय कथा मराठी प्रेक्षकांना देखील आवडू लागल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वात आजवर रोमँटिक, ॲक्शन, रहस्यमय असे अनेक चित्रपट आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत आता ‘रघु ३५०’ चित्रपटाची भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत 'रघु ३५०' चित्रपटाबद्दल बरीच कुजबुज सुरू होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं होतं. या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारा पाठमोरा तरुण नेमका आहे तरी कोण याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर हे गुपित आता उलगडलं आहे. सोशल मीडियावर 'रघु ३५०' चित्रपटाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर चित्रपटाच्या थाटामाटात संपन्न झालेल्या फर्स्ट लूक आणि संगीत अनावरण सोहळ्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या चित्रपटातून धुमाकूळ घालण्यास सज्ज असलेल्या कलाकारांची नावं आता समोर आली आहेत.
या चित्रपटाच्या पोस्टरवर पाहिल्याप्रमाणे चित्रपटात ऍक्शनची साथ पाहायला मिळत आहे. तसेचं, रोमँटिक क्षणही असणार आहेत असं कळतंय. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते, तानाजी गलगुंडे, संजय खापरे आणि अभिनेत्री अदिती कांबळे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरवरून चित्रपटाची कथा उलगडण्यास कठीण जात असलं तरी येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट पाहता येणार आहे. नुकताच चित्रपटातील कलाकार मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत फर्स्ट लूक व संगीत अनावरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला. चित्रपटातील दमदार गाणी नक्कीच थिरकायला भाग पाडतील यांत शंका नाही.
'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर, दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली असून, चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची बाजू आश्विन भंडारे आणि ओंकार स्वरूप यांनी सांभाळली आहे. तर, चित्रपटात असणाऱ्या रोमँटिक अशा गाण्यांना आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि ओंकार स्वरूप यांनी त्यांचा सुमधुर आवाज दिलेला पाहायला मिळत आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.